महिलांच्या रग्बी स्पर्धेत फिजीला विजेतेपद Print

क्रीडा प्रतिनिधी ,पुणे

फिजी संघाने गतविजेत्या चीनला १५-० असे हरवित महिलांच्या आशियाई विभागीय रग्बी स्पर्धेत विजेतेपद मिळविले आणि पहिल्याच प्रयत्नात जागतिक स्पर्धेतील प्रवेशही निश्चित केला. फिजी व चीन यांच्याबरोबरच जपाननेही पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत फिजी संघाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळविला, त्याचे श्रेय असिनाते युफिया, रुसीला नागासौ व लॅव्हेनिया टिनाई यांनी केलेल्या प्रत्येकी पाच गोलांना द्यावे लागेल. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जपानने गतवेळी उपविजेतेपद मिळविणाऱ्या कझाकिस्तानचा १७-७ असा पराभव केला. त्यावेळी जपानकडून युमे ओकुरोदा हिने १२ तर योको सुझुकी हिने पाच गोल केले. कझाकिस्तानकडून शेरॉर ल्युडमिला हिने पाच गोल केले तर आयरिना रेझेवील हिने दोन गोल मारले.  
उपांत्य फेरीत फिजीने जपानचे आव्हान ३१-७ असे संपुष्टात आणले होते. चीनने चुरशीच्या लढतीत कझाकिस्तानवर १७-१२ अशी मात केली होती. त्याआधी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत जपानने थायलंडला १२-५, फिजी संघाने सिंगापूरला ४७-० असे हरविले होते. कझाकिस्तानने चीन तैपेई संघाचा ३४-० असा धुव्वा उडविला होता. चीन संघाने हाँगकाँगचा ३१-० असा दणदणीत पराभव केला होता.
प्लेट विभागातील अंतिम फेरीत हाँगकाँग संघाने थायलंडला १९-७ असे पराभूत करीत विजेतेपद मिळविले. सिंगापूरने चीन तैपेई संघावर १२-५ अशी मात करीत तिसरे स्थान मिळविले.
स्पर्धेतील पहिल्या दिवशी दोन सामने गमाविणाऱ्या भारताने शेवटच्या दिवशी मलेशियावर ५-० अशी मात करीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यावेळी हे पाचही गोल सुरभि दाते हिने नोंदविले.