ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारताची घसरण Print

पी.टी.आय. दुबई
alt

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीचा फटका भारतीय संघाला क्रमवारीत बसला आहे. भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. यंदाचे विश्वचषक विजेते वेस्ट इंडिजने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सुपर एट गटातच आव्हान संपुष्टात आलेला भारतीय संघ अवघ्या एका गुणाने वेस्ट इंडिजच्या मागे आहे. उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला श्रीलंकेचा संघ अव्वल स्थानी आहे.
दरम्यान भारतीय संघाची कामगिरी लौकिलाला साजेशी न होताही विराट कोहली आणि सुरेश रैनाने क्रमवारीतील आपले स्थान कायम राखले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली पाचव्या तर रैना दहाव्या स्थानी आहे.
विश्वचषक विजेत्या संघातील मार्लन सॅम्युअल्स आणि सुनील नरिन यांनी क्रमवारीत आगेकूच केली आहे. स्पर्धेत २३० धावा फटकावणाऱ्या सॅम्युअल्सने १८व्या स्थानी झेप घेतली आहे. तडाखेबंद फलंदाजी करणारा ख्रिस गेलने दुसऱ्या स्थानी आहे तर न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युल्लम अव्वल स्थानी आहे.  
मिताली राज क्रमवारीत सर्वोत्तम भारतीय
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक भारतीय संघासाठी दुस्वप्नच ठरला. साखळी गटातच भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. मात्र भारताची कर्णधार मिताली राजने क्रमवारीतील आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत मिताली तिसऱ्या स्थानी आहे. गोलंदाजांमध्ये झूलन गोस्वामीची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. हरप्रीत कौर नवव्या तर पूनम राऊत विसाव्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अमिता शर्मा ११व्या स्थानी तर झूलन गोस्वामी ११व्या स्थानी आहे.