नव्या आव्हानासाठी आयपीएल संघ सज्ज Print

शुक्रवारपासून चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेचा थरार
पी.टी.आय.जोहान्सबर्ग
alt

श्रीलंकेतील ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा कार्निव्हल ओसरतोच तोच आणखी एक ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू होत आहे. आयपीएलमधील चार संघ या नव्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या आयपीएलचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे स्पर्धेत सहभागी होत आहेत. पात्रता फेरीच्या सामन्यांनी मंगळवारी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
श्रीलंकेचा उवा नेक्स्ट आणि इंग्लंडचा यॉर्कशायरचा संघ सलामीच्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या लढतीनंतर ऑकलंड ऐस आणि सियालकोट स्टॅलिअन्स यांच्यात मुकाबला रंगणार आहे. मुख्य स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी सहा संघांमध्ये चुरस आहे.
प्रत्येकी तीन असे दोन गट असून, गटातील अव्वल संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरेल. पहिल्या गटात न्यूझीलंडचा ऑकलंड ऐस, इंग्लंडचा हॅम्पशायर आणि पाकिस्तानचा सियालकोट स्टॅलिअन्स यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटामध्ये वेस्ट इंडिजचा त्रिनिदाद एण्ड टोबॅगो, श्रीलंकेतर्फे उवा नेक्स्ट तर इंग्लंडचा यॉर्कशायर हे संघ आहेत.
मुख्य फेरीचे सामने १३ ऑक्टोबरपासून रंगणार आहेत. भारतीय संघांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स एकमेकांसमोर आहेत. डेअरडेव्हिल्सचे नेतृत्त्व सेहवागऐवजी जयवर्धनेकडे सोपवण्यात आले आहे.  महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि हरभजन सिंग कर्णधार असलेला मुंबई इंडियन्सही जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.  भारतीय संघांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा हायवेल्ड लायन्स तर ऑस्ट्रेलियाचे पर्थ स्क्रॉचर्स आणि सिडनी सिक्सर्स सहभागी होणार आहेत.