शेरास सव्वाशेर! Print

बार्सिलोना-रिअल माद्रिद यांच्यातील लढत २-२ ने बरोबरीत
लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे प्रत्येकी दोन गोल
वृत्तसंस्था , बार्सिलोना
alt

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत रंगलेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील महामुकाबल्यात प्रेक्षकांनी क्रिकेटची पर्वणी अनुभवल्यानंतर लगेचच बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील द्वंद पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. स्पॅनिश (ला लीगा) लीगमधील या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील आणि लिओनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या खेळाची जुगलबंदी पाहून सर्वच जण अचंबित झाले. बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील बहुचर्चित अशी ही लढत २-२ अशी बरोबरीत सुटली तरी मेस्सी आणि रोनाल्डो यांनी प्रत्येकी दोन गोल करत आपण ‘शेरास सव्वाशेर’ असल्याचे दाखवून दिले.
या लढतीनंतर बार्सिलोनाने रिअल माद्रिदला आठ गुणांनी मागे टाकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. कॅम्प न्यू येथे झालेल्या या सामन्याला तब्बल ९८ हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कार्लोस प्युयोल आणि गेरार्ड पिक या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थित बार्सिलोनाने जेवियर मॅस्कारेन्हो याच्या जागी अ‍ॅड्रियानो कोरिया याला संधी दिली. गेल्या सहा सामन्यात विजय मिळवणाऱ्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये पासिंगचा आणि बचावफळीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. बार्सिलोनाने सुरुवातीला चेंडूवर जास्त वेळ ताबा मिळवला तरी रोनाल्डोने २३व्या मिनिटाला गोल करून रिअल माद्रिदला आघाडी मिळवून दिली. पण बार्सिलोनाचा स्टार खेळाडू मेस्सी याने काही मिनिटानंतरच गोल करून बरोबरी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ६१व्या मिनिटाला मेस्सीने फ्री-किकवर दुसरा गोल करून बार्सिलोनाला आघाडीवर आणले. पण पाच मिनिटानंतरच रोनाल्डोच्या दुसऱ्या गोलमध्ये रिअल माद्रिदने बरोबरी साधून सामन्यात रंगत आणली. शेवटच्या क्षणी बार्सिलोनाला निर्णायक आघाडी घेण्याची संधी होती. मात्र मार्टिन मोन्टोयाने सुरेख चाल रचून गोल करण्याची संधी निर्माण केली. पण त्याला गोल करण्यात अपयश आले.
बार्सिलोनाचे प्रशिक्षक टिटो व्हिलानोव्हा यांनी एड्रियानोच्या कामगिरीची स्तुती केली आहे. ‘‘रिअल माद्रिद संघ या सामन्यात जोमाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल, याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे आम्ही दोन दिवसांपासून एड्रियानोकडून सराव करवून घेतला. त्याची या सामन्यातील कामगिरी चांगली झाली. मेस्सी हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे, यात शंकाच नाही.’’