घरच्या वातावरणाचा फायदा घेण्यात गैर काय? Print

हरभजन सिंगचा सवाल
पी.टी.आय.

ग्रेटर नोइडा
इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टय़ा बनविण्याचे डावपेच योग्य असल्याचे विराट कोहलीने शनिवारी म्हटले होते. रविवारी भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनेही हेच मत व्यक्त केले आहे. घरच्या वातावरणाचा फायदा घेण्यात गैर काय, असा सवाल यावेळी हरभजनने विचारला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चार कसोई सामन्यांच्या मालिकेद्वारे पुनरागमन करण्यासाठी हरभजन उत्सुक आहे. इंग्लंडला ‘व्हाइट वॉश’ देऊनच भारत बदला घेईल. कारण गतवर्षी इंग्लंडमध्ये भारताने ०-४ अशा फरकाने मानहानीकारक पराभव पत्करून मालिका गमावली होती.
‘‘भारताने ४-० अशा फरकाने मालिका जिंकायला हवी. आम्ही घरच्या मैदानांवर खेळणार आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही आमचा अनुभव आणि वातावरणाचा फायदा घेऊ. तिथे कोणतीही तडजोडी केली जाणार नाही’’, असे हरभजन यावेळी म्हणाला. दुसऱ्या फॉम्र्युला-वन भारतीय ग्रां. प्रि. स्पध्रेसाठी हरभजन बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर आला होता. ‘‘केव्हिन पीटरसन परतल्यामुळे इंग्लंडचा संघ अधिक मजबूत झाला आहे’’, असे हरभजनने सांगितले. फेरारीकडून आमंत्रित करण्यात आलेली अभिनेत्री गीता बसरासोबत हरभजनने रविवारी फॉम्र्युला-वन शर्यतीचा आनंद लुटला. तो पुढे म्हणाला की, ‘‘मी फेरारीचा खंदा पाठीराखा आहे. अलोन्सो फर्नाडो हा माझा आवडता चालक आहे. मी गतवर्षी फेरारीच्या गॅरेजमध्येही गेलो होतो. तिथे मी बऱ्याच जणांना भेटलो.’’