सायनाने विजेतेपदाची संधी गमावली Print

अंतिम फेरीत मिनात्सूकडून पराभूत
फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा

पी.टी.आय.
पॅरिस
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पध्रेपाठोपाठ फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची संधी भारताच्या सायना नेहवालने गमावली. स्पर्धेत सनसनाटी विजयी मालिका करणाऱ्या जपानच्या मिनात्सू मितानी हिने तिच्यावर २१-१९, २१-११ अशी मात केली.
ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविल्यानंतर पहिलीच स्पर्धा खेळताना सायनाने नुकतीच डेन्मार्क ओपन स्पर्धा जिंकली होती. पॅरिसमध्येही अग्रमानांकित सायनाकडून विजेतेपदाची अपेक्षा होती, मात्र जपानी खेळाडू मिनात्सू हिने आश्चर्यजनक विजयाची मालिका कायम राखत सायनाला सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले. ३९ मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या गेममध्ये सायनाचा प्रभाव दिसला, मात्र मिनात्सू हिने तिला आघाडी मिळवून दिली नाही. दुसऱ्या गेममध्ये सायनाने सपशेल निराशा केली.
मिनात्सू हिने येथे अंतिम फेरीत स्थान मिळविण्यापूर्वी सहावी मानांकित खेळाडू यान जियाओ जियांग व तृतीय मानांकित टिनी बाऊन यांच्यावर सनसनाटी विजय नोंदविला होता. जागतिक क्रमवारीत तिला २६वे स्थान आहे तर सायना हिला तृतीय स्थान आहे. या लढतीपूर्वी सायना व मिनात्सू यांच्यात तीन वेळा लढती झाल्या होत्या. या तीनही लढतींमध्ये सायना जिंकली होती.
सायना ही बॅकहँड परतीच्या फटक्यांबाबत थोडीशी कमकुवत आहे, हे लक्षात घेऊनच मिनात्सू हिने आज अधिकाधिक वेळा सायनाला बॅकहँडवर ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने कॉर्नरजवळ सुरेख प्लेसिंग केले. दोन्ही खेळाडूंनी स्मॅशवर प्रत्येकी पाच गुण मिळविले. नेटजवळील प्लेसिंगवर मिनात्सूने १० तर सायनाने ९ गुण मिळविले. अन्य शैलीमध्ये मिनात्सूने २२ गुण मिळविले तर सायनास फक्त १२ गुण घेता आले. पहिली गेम गमावल्यानंतर सायना दुसरी गेम घेण्याचा प्रयत्न करील अशी अपेक्षा होती, मात्र ११-१० अशा आघाडीनंतर मिनात्सूने सायनाचा बचाव निष्प्रभ ठरविला. तिने त्यानंतर सायनास केवळ एकच गुण मिळवून दिला. मिनात्सू हिने सायनाच्या तुलनेत चांगले चापल्य दाखविले. या गेममध्ये तिने सायनाची खूपच दमछाक केली.