आठवडय़ाची मुलाखत : मुंबईला हवं फक्त जेतेपदच! Print

सुलक्षण कुलकर्णी
मुंबई क्रिकेट संघाचे प्रशिक्षक

प्रशांत केणी, मुंबई
विक्रमी ४०वे अजिंक्यपद जिंकण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी सज्ज होत आहे. गतवर्षीपर्यंत चालत आलेल्या एलिट आणि प्लेट गटाला रजा देऊन यंदाच्या वर्षीपासून रणजी करंडक स्पर्धा नव्या स्वरूपात अस्तित्वात येत आहे. माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर माजी फलंदाज आणि यष्टीरक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्याकडे गेल्या वर्षी मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली. मुंबईने मागील हंगामात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदाच्या हंगामाला सामोरे जाण्यासाठी कुलकर्णी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे एक खास योजना सादर केली होती. त्याची अंमलबजावणी एमसीएने करून नव्या हंगामाला आत्मविश्वासाने सामोरे जाणार असल्याचा निर्धार प्रकट केला. वानखेडे स्टेडियमवर रेल्वेविरुद्धच्या सलामीच्या सामन्याने मुंबईच्या रणजी हंगामाचा प्रारंभ होईल. यंदा रणजीचे नवे स्वरूप, नवी गुणदान पद्धती आणि नव्या आव्हानांबाबत प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी केलेली खास बातचीत -
मुंबईचे प्रशिक्षक म्हणून तुमच्या संघाकडून कोणत्या अपेक्षा आहेत?
गतवर्षी दुर्दैवाने रणजी करंडक जिंकू शकलो नाही, याचे दु:ख नक्कीच आहे. गेल्या वर्षीसुद्धा आपण तयारी चांगली केली होती. अनेक नवे खेळाडू आपल्याला गतवर्षी मिळाले. त्याचा फायदा आपल्याला यंदा निश्चितच होईल. मुंबईचे वरिष्ठ क्रिकेटपटूही यंदा आमच्यासोबत आहे. मुंबईकर हा क्रिकेट जगतो. त्यामुळे या वेळी आम्ही रणजी करंडक स्पध्रेत चांगली कामगिरी करून दाखवू, याविषयी मला विश्वास आहे. ‘स्वप्ने पाहा, ती पूर्ण होतात’ असे सचिन सांगतो. मुंबई रणजी जिंकण्यासाठीच खेळते. विजेतेपदापेक्षा कमी यंदा आम्हाला काहीच नको.
सचिन तेंडुलकर आणि झहीर खानसारखे दिग्गज खेळाडू रेल्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईतून खेळणार आहेत, याविषयी काय सांगाल?
सचिन आणि झहीर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. काही वर्षांच्या अंतराने सचिन रणजीमध्ये खेळतो आहे.
राजस्थान, हैदराबाद, बंगाल यांसारखे संघ यंदा मुंबईच्या गटात आहेत. त्यामुळे आव्हान कितपत कठीण आहे?
रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील सर्व संघ चांगलेच असतात. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. मुंबईचाही संघ प्रत्येक सामन्याकडे गांभीर्यानेच पाहतो. गेल्या वर्षी मुंबईच्या गटातील सातपैकी पाच संघ रणजी विजेते होते, पण तरीही आपण साखळीत विजेते झालो होतो. यंदाही परिस्थिती तशीच आहे. प्रत्येक संघाचा आम्हाला सामन्यागणिक अभ्यास करावा लागेल. फार पुढचा विचार करण्यापेक्षा एकेक सामना जिंकत आगेकूच करण्याची योजना आहे. त्यामुळे आम्ही चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करून जेतेपदासाठी प्रयत्न करू, याबाबत मी आशावादी आहे.
यंदा रणजी क्रिकेटमध्ये नवी गुणदान पद्धती राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कोणती व्यूहरचना तुम्ही आखली आहे?
नव्या गुणदान पद्धतीचा संघाच्या व्यूहरचनेवर कोणताही परिणाम होणार नाही. निर्णायक विजयासाठी एक गुण अधिक मिळणार आहे. याशिवाय डावाने विजय किंवा दहा विकेट राखून विजय मिळविल्यास एक गुण अधिक मिळविण्याचीही सुवर्णसंधी आहे. बरेचसे संघ सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या धोरणात त्यामुळे बदल होऊ शकतो. परंतु मुंबईचा असा दृष्टिकोन कधीच नसतो. मुंबईचा संघ नेहमी सामना जिंकण्यासाठीच प्रयत्नशील करतो. आता एक गुण अधिक मिळणार, ही चांगली गोष्ट आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये गेली काही वष्रे सामने निर्णायक होताना दिसतात. रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या साखळी सामन्यांमध्ये मात्र ही निर्णायकता कमी प्रमाणात आढळून येते?
मागच्या वर्षीच्या मुंबईच्या कामगिरीकडे आपण पाहिले तर सातपैकी तीन सामन्यांत आपण निर्णायक विजय मिळवले होते. दोन सामन्यांत आपण पहिल्या डावाच्या बळावर विजय मिळवला होता, तर एक सामना पहिल्या डावाच्या बळावर गमावला होता. त्यामुळे बहुतांशी सामने आपण जिंकले आहेत. आपण निर्णायक विजयासाठीच प्रत्येक सामन्यात प्रयत्न केले होते. गेल्या वर्षी आपला पहिलाच रणजी सामना होता तो रेल्वेशी. त्या सामन्यात आपण डावानिशी विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने तरी अशी कोणतीही स्थिती नव्हती की निर्णायक विजयाची आम्हाला संधी होती आणि आम्ही ती टाळली.
यंदा मुंबई संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी कोणत्या विशेष योजना आखल्या आहेत?
कोणत्याही विशेष योजना आखलेल्या नाहीत. पण चांगल्या कामगिरीनिशी मुंबईचा रुबाब कायम राखण्याचा माझा निर्धार आहे. पण या रणजी हंगामाच्या दृष्टीने मी एक योजना एमसीएकडे मांडली होती. ती योजना एमसीएने अमलात आणल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. एक रणजी हंगाम संपल्यानंतर पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे आपल्याकडे पावसाळा सुरू असताना अन्यत्र ज्या हंगामपूर्व स्पर्धा होतात, त्याचा आपण चांगला फायदा उठवू, अशी माझी योजना होती. ती आपण यंदा यशस्वीपणे राबवली. बंगळुरूत आपण अंतिम फेरीत पोहोचलो, बुची बाबू करंडक क्रिकेट स्पध्रेत उपांत्य फेरी गाठली, तर नागपूरमध्ये आपण विजेते झालो. याशिवाय बीसीसीआयची स्पर्धा आणि टाइम्स शिल्ड या स्पर्धाही झाल्या. त्यामुळे खेळाडूंना अधिकाधिक सामन्यांचा सराव मिळाला. त्यामुळे मुंबईच्या युवा आणि दुसऱ्या फळीतील खेळाडूंना ते फायदेशीर ठरले आणि त्यांची स्थानिक हंगामासाठी चांगली पूर्वतयारी झाली.