वेटेलराज! Print

*  वेटेलचा जेतेपदाचा चौकार
*  अलोन्सोला मागे टाकून विश्वविजेतेपदाकडे कूच
तुषार वैती, नोएडा, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

सॅबेस्टियन वेटेलने सुरुवातीपासूनच शर्यतीवर राखलेली हुकूमत.. फर्नाडो अलोन्सो, मार्क वेबर यांच्यात रंगलेली ‘काँटे की टक्कर’.. अपघातांचा सिलसिला.. फोर्स इंडियाने अव्वल दहा जणांत मिळविलेले स्थान.. नरेन कार्तिकेयनने केलेली निराशा.. यामुळे इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचा दुसरा मोसम गाजला. वेटेलने अपेक्षेप्रमाणे जेतेपद पटकावून विजेतेपदाचा चौकार लगावला आणि फेरारीचा प्रतिस्पर्धी फर्नाडो अलोन्सो याला मागे टाकून विश्वविजेतेपदाच्या दिशेने कूच केली.

वेटेलने सलग दुसऱ्यांदा भारतीय चाहत्यांची मने जिंकली. शर्यत जिंकल्यानंतर त्याने चाहत्यांचे आभार मानले, तसेच चाहत्यांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी त्याने सर्किटला आणखी एक फेरी मारली.
पहिल्या स्थानापासून सुरुवात करणाऱ्या वेटेलने अखेरच्या टप्प्यापर्यंत शर्यतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. भन्नाट वेगाने गाडी चालवणाऱ्या वेटेलने ६० फेऱ्या कधी पूर्ण केले, हे चाहत्यांना समजलेच नाही. बुद्ध इंटरनॅशनल सर्किटचा ट्रॅक त्याच्यासाठी यशदायी ठरला. तीन सराव शर्यती आणि पात्रता फेरीसह मुख्य शर्यतीतही त्याने बाजी मारली. वेटेलने १ तास ३१ मिनिटे आणि १०.७४४ सेकंदांसह ही शर्यत पूर्ण करून सिंगापूर, जपान, कोरिया आणि भारत अशा लागोपाठ चार शर्यती जिंकण्याची किमया साधली. अखेरच्या क्षणी वेटेलच्या कारचा खालचा भाग जमिनीला आदळत होता. पण तरीही न डगमगता त्याने जेतेपदावर नाव कोरले. या अप्रतिम कामगिरीमुळे रेड बुलच्या वेटेलने २४० गुणांसह अलोन्सोला (२२७) १३ गुणांच्या फरकाने मागे टाकून जागतिक ड्रायव्हर्स अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.
सुरुवात हा फॉम्र्युला-वनमधील महत्त्वाचा भाग. या वेळीही सुरुवातीलाच एकमेकांना मागे टाकण्याचा थरार अनुभवता आला. पाचव्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या फर्नाडो अलोन्सोने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. मात्र तिसऱ्या फेरीमध्ये त्याला रेड बुलच्या मार्क वेबरने मागे टाकले. अलोन्सोच्या मार्गात वेबरचा अडथळा आल्याने वेटेलने सुसाट गाडी पळवत मोठी आघाडी घेतली. अखेर ४७व्या फेरीमध्ये वेबरला एका वळणावर सुरेखपणे ‘ओव्हरटेक’ करत अलोन्सो दुसऱ्या स्थानी पोहोचला. पण बऱ्याच पुढे निघून गेलेल्या वेटेलला गाठणे त्याला जमले नाही. अलोन्सो दुसऱ्या तर वेबर तिसऱ्या स्थानी आला. चौथ्या स्थानासाठी लुइस हॅमिल्टन, जेन्सन बटन, फेलिपे मासा आणि किमी रायकोनेन यांच्यात कडवी चुरस रंगली होती. पण मॅकलॅरेनच्या हॅमिल्टन आणि बटन यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान पटकावण्यात यश मिळवले. फेरारीच्या फेलिपे मासाला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. लोटसचा रायकोनेन सातव्या स्थानी आला तरी २६व्या फेरीमध्ये निळा झेंडा दाखवूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या रायकोनेनच्या या कृत्याची चौकशी केली जाणार आहे.
सात वेळा विश्वविजेता ठरलेल्या आणि या मोसमाअखेर निवृत्त होणाऱ्या मायकेल शूमाकरला चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. पाचव्या फेरीमध्ये शूमाकरच्या कारचा टायर निखळला. त्याच स्थितीत गाडी पिट-लेनमध्ये नेऊन त्याने कारची दुरुस्ती करून पुन्हा शर्यतीला सुरुवात केली. यात बराच वेळ गेल्याने शूमाकरला २२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याआधी सौबेरच्या सर्जी पेरेझच्या कारचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्याला शर्यतीबाहेर पडावे लागले. ४४व्या लॅपदरम्यान वळण घेताना कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हिस्पानिया संघाच्या प्रेडो डे ला रोस्साची कार सुरक्षाभिंतीवर जाऊन आदळली. त्यामुळे रोस्साचेही आव्हान संपुष्टात आले. सहारा फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गने आठवे स्थान पटकावताना भारतीय चाहत्यांना दिलासा दिला तरी त्याचा सहकारी पॉल डी रेस्टाला १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या नरेन कार्तिकेयनने २१व्या क्रमांकावर मजल मारली. त्याआधी लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग याने झेंडा दाखवून शर्यतीला सुरुवात केली. गायक शानसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अजय देवगण यांनी राष्ट्रगीत गाऊन चाहत्यांच्या आनंदात आणखी भर घातली.    

इंडियन ग्रां. प्रि.ची दोन्ही वर्षे माझ्यासाठी लाभदायक ठरली. सलग दुसऱ्या वर्षी पोल पोझिशन आणि त्यानंतर जेतेपद पटकावता आल्याचा आनंद झाला आहे. जेतेपदासाठी आम्ही भरपूर मेहनत घेत असतो. आमच्यासाठी चांगली कार बनवण्यासाठी संघातील सदस्य दिवस-रात्र मेहनत घेत असतात. त्यामुळे हे यश सांघिक आहे. भारतात यायला मला नेहमीच आवडते. या वर्षी इथले बरेच चित्र बदलले आहे. भारतातल्या लोकांना आणि येथील संस्कृती जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. गेल्या वर्षी मी अनेक ठिकाणी फिरलो होतो. भारताविषयी जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे. आयुष्यात प्रत्येकाकडून बऱ्याच अपेक्षा असतात. त्यात पैशाची भूमिका महत्त्वाची असते. पण माझ्या मते प्रत्येकाने आपले कुटुंब आणि मुलांसोबत निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायला हवे.
 सॅबेस्टियन वेटेल, विजेता

सध्या रेड बुल संघाला टक्कर देणे कठीण असले तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. मी १३ गुणाने पिछाडीवर पडलो असून मला सुधारणा करण्याची गरज आहे. आता अबूधाबी आणि अमेरिकेतील शर्यतीत कामगिरी उंचवावी लागणार आहे. सरळ ट्रॅकवर मी वेगाने कार चालवू शकलो, पण वळणे घेताना माझा वेग मंदावत होता. तरीही पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेता आली, ही समाधानाची बाब आहे. पुढील शर्यतीत माझी कामगिरी चांगली होईल, अशी आशा आहे.
 फर्नाडो अलोन्सो, उपविजेता

पोडियमवर स्थान मिळवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला तरी मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी चाहत्यांचा आभारी आहे. माझ्यासाठी ही शर्यत फारच खडतर होती. अलोन्सो आणि लुइस हॅमिल्टन हे माझ्यापेक्षा तगडे प्रतिस्पर्धी होते. पण मी ज्या पद्धतीने कार चालवली, त्यावर मी आनंदी आहे.
  मार्क वेबर, तिसरा क्रमांक