इंग्लंडपुढे आव्हान भारतीय युवा सेनेचे Print

पहिला सराव सामना आजपासून
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
२७ वर्षे भारतीय मातीत विजय मिळवता आला नसला, तरी ‘छोडो कल की बातें’ म्हणत अ‍ॅलिस्टर कुकचा इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला असून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सराव सामन्याने त्यांची या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय ‘अ’ संघ सज्ज झाला असून इंग्लंडपुढे आव्हान असेल ते या युवा सेनेचे.
भारतात २००६ साली दमदार पदार्पण करणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकवर इंग्लंडच्या संघाचे कर्णधारपद असून त्याच्याकडून ब्रिटनवासीयांच्या नक्कीच मोठय़ा अपेक्षा असतील. १९८४-८५ साली डेव्हिड ग्राव्हरच्या कप्तानीखाली इंग्लंडने भारतात मालिका जिंकली होती, पण त्यानंतर मात्र त्यांना एकदाही मालिका जिंकता आलेली नाही. गेल्या तीन दिवसांपासून इंग्लंडचा संघ दुबईमध्ये सराव करत होता. केव्हिन पीटरसनच्या आगमनाने इंग्लंडचा संघ अधिक बळकट झाला आहे, कारण या इंग्लंडच्या संघात भारतीय खेळपट्टीचा आणि वातावरणाचा अनुभव असलेले फार कमी खेळाडू आहेत. पीटरसन आणि कुकबरोबर जोनाथन ट्रॉट, इयान बेल यांच्यावर इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त असेल. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, टीम ब्रेसनन आणि स्टीव्हन फिन यांच्यावर असेल. भारतीय खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याने संघात ग्रॅमी स्वान आणि माँटी पनेसार यांचा समावेश करण्यात आला आहे.
रैनाच्या भारतीय ‘अ’ संघाकडे एकही पूर्णवेळ फिरकीपटू नसल्याने त्यांना मध्यमगती आणि कामचलाऊ फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागेल. इरफान पठाण, विनय कुमार आणि अशोक दिंडावर गोलंदाजीची भिस्त असेल. कर्करोगाशी झगडून मैदानात परतलेल्या आणि दुलिप करंडक स्पर्धेत द्विशतक झळकावणाऱ्या युवराज सिंगवर साऱ्यांच्याच नजरा असतील. अजिंक्य रहाणे, मुरली विजय, मनोज तिवारी, अंबाती रायुडू या युवा
फलंदाजांना चांगली कामगिरी करून भारतीय संघाचा दरवाजा ठोठावण्याची ही नामी संधी ठरू  शकते.            प्रतिस्पर्धी संघ
भारतीय ‘अ’ संघ : सुरेश रैना (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, युवराज सिंग, मनोज तिवारी, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), इरफान पठाण, आर. विनय कुमार, परविंदर अवाना, अशोक दिंडा, रॉबिन बिश्त, अशोक मनेरिया आणि अभिनव मुकुंद.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टोव्ह, इयान बेल, टीम ब्रेसनन, स्टुअर्ट ब्रॉड, निक कॉम्पटन, स्टिव्हन फिन, ग्रॅहम ओनियन्स, इऑन मॉर्गन, माँटी पनेसार, समित पटेल, केव्हिन पीटरसन, मॅट प्रायर (यष्टिरक्षक), जो रूट, ग्रॅमी स्वान आणि जोनाथन ट्रॉट.