पंकज अडवाणी सातव्यांदा विश्वविजेता Print

पी.टी.आय., लीड्स

भारताच्या पंकज अडवाणी याने सातव्यांदा बिलियर्ड्सच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्याने जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत इंग्लंडच्या माईक रसेल याच्यावर १८९५-१२१६ असा मोठय़ा फरकाने विजय मिळविला. पंकजने रसेलविरुद्धच्या लढतीत सुरुवातीला १४७ गुणांचा ब्रेक नोंदवित शानदार प्रारंभ केला. पाच तासांच्या या लढतीत त्याने २९८ गुणांचा ब्रेक केला. पंकजपेक्षा अनुभवाने वरचढ असलेल्या रसेलने ३९७ गुणांचा विक्रमी ब्रेक करीत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. तथापि पंकजने पहिल्या टप्प्यातच १३१ व ९२ असे आणखी उल्लेखनीय ब्रेक करीत आघाडी बळकट केली. दुसऱ्या टप्प्यात पंकजने सुरुवातीला १२८, ९४ व १०८ असे तीन उल्लेखनीय ब्रेक नोंदवित आपली आघाडी कायम राखली.
पंकज याने उपांत्य फेरीत आपलाच सहकारी ध्रुव सितवाला याच्यावर ८८१-२८१ अशी सहज मात केली होती. या फेरीतील मोठय़ा विजयामुळे पंकजचा आत्मविश्वास उंचावला.
स्पर्धेतील पॉईन्ट्स स्वरूपाच्या विभागात पंकजला पीटर गिलख्रिस्टकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तथापि पंकजने निराश न होता वेळेच्या स्वरूपाच्या (टाईम फॉरमॅट) स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.
पंकजने याच शहरात २००९ मध्ये व्यावसायिक बिलियर्ड्स स्पर्धेत विजेतेपद मिळविताना रसेल याच्यावर मात केली होती. पंकजने २००५ मध्ये एकाच वेळी टाईम व पॉईन्ट्स अशा दोन्ही प्रकारात विश्वविजेतेपद मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली होती. दोन्ही प्रकारात एकाच स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविणारा तो पहिलाच खेळाडू होता. त्यानंतर २००८ मध्ये त्याने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. २००७ मध्ये त्याने टाईम फॉरमॅटमध्ये, तर २००९ मध्ये व्यावसायिक विभागात अजिंक्यपद मिळविले.
पॉईन्ट्स प्रकारात रुपेश शहा विजेता
भारताच्या रुपेश शहा याने स्पर्धेतील पॉईन्ट्स प्रकारात विश्वविजेता होण्याचा मान मिळविला. कारकिर्दीतील दुसरे विश्वविजेतेपद मिळविताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू बोल्टोन याच्यावर ६-२ अशा फ्रेम्सने मात केली.