फॉम्र्युला-फन! Print

तुषार वैती - मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

फॉभारतासारख्या क्रिकेटवेडय़ा देशात अन्य खेळांना म्हणावी तितकी लोकप्रियता मिळत नाही, हे तितकेच सत्य आहे. टीव्हीवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या आणि जगभरात अन्य खेळांच्या तुलनेने सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या फॉम्र्युला-वनच्या बाबतीतही भारतात तेच घडत आहे. गेल्या वर्षी इंडियन ग्रां. प्रि.च्या यशस्वी पदार्पणानंतर भारतात फॉम्र्युला-वन हा खेळ मोठी भरारी घेईल, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे घडलेच नाही. तिकिटांचे दर कमी करूनही फॉम्र्युला-वनला गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळालेला कमी प्रतिसाद, यावरून फॉम्र्युला-वनची लोकप्रियता वाढली की घटली, याची कारणे आता शोधावी लागणार आहेत.
१९८०च्या दशकात फॉम्र्युला-वनला आर्यटन सेन्ना, अलेन प्रोस्ट आणि नेल्सन पिकेट यांनी यशोशिखरावर आणून ठेवले. त्याकाळी फॉम्र्युला-वन शर्यतींचे थेट प्रक्षेपण पाहणे शक्य नसल्याने फॉम्र्युला-वनचे निस्सीम चाहते काही आठवडय़ांनंतर मिळणाऱ्या कॅसेटद्वारे शर्यतीचा आनंद लुटायचे. पण ९०च्या दशकात सॅटेलाइट क्रांती झाली आणि सर्वाना शर्यतीचा थेट आनंद घरी बसल्या लुटता येऊ लागला. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल फेडरेशनने (एफआयए) आशिया खंडाकडे मोर्चा वळवला. त्यामुळे २०११मध्ये भारताला पहिल्यावहिल्या फॉम्र्युला-वन शर्यतीचे संयोजन करता आले. मायदेशात होणाऱ्या फॉम्र्युला-वनच्या उत्सुकतेपोटी दर्दी चाहत्यांनी नोएडा गाठून या शर्यतीचा आनंद घेतला. तब्बल ९५ हजार प्रेक्षकांनी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर हजेरी लावली. पण या वर्षी इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सर्व सुविधा असतानाही चाहत्यांनी फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी उत्सुकता दाखवली नाही. याची अनेक कारणे आहेत.
दिल्ली ते बुद्ध इंटरनॅशनल सर्किट हे अंतर ७० किलोमीटर. सर्किटवर पोहोचण्यासाठी खाजगी वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शर्यतीसाठी येथे येणाऱ्या प्रत्येकालाच असंख्य अडीअडचणींना सामोरे जावे लागते. सर्किटवर पोहोचेपर्यंत अनेकांची शक्ती, ऊर्जा संपून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे, स्थानिक लोकांना फॉम्र्युला-वन म्हणजे काय, हेच माहीत नाही. सर्किटशेजारी ४-५ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या लोकांना सर्किटवर काय चालते, याचा थांगपत्ताच नाही. फक्त गाडय़ांचे आवाज कानावर पडतात, इतकीच कल्पना त्यांना आहे. फॉम्र्युला-वनचा चाहतावर्ग हा दिल्लीपेक्षा मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये जास्त आहे. या वर्षी विमान तिकिटांच्या किमती वाढल्यामुळे अनेक चाहत्यांनी टीव्हीवरूनच हा खेळ पाहणे पसंत केले.
गेल्या वर्षी झोकात पुनरागमन केल्यानंतर फॉम्र्युला-वनची लोकप्रियता वाढवण्यात संयोजकांना आलेले अपयश, हे मुख्य कारण म्हणता येईल. फॉम्र्युला-वनच्या पदार्पणासाठी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटचे काम झटपट उरकण्यात आले. पण त्यानंतर वर्षभर या सर्किटवर एकही शर्यत आयोजित करण्यात आली नाही. खरे तर लोकप्रियता वाढवण्यासाठी सर्किटवर वर्षभर कोणत्या घडामोडी होतात, याची कल्पना लोकांना येण्यासाठी अधिकाधिक शर्यतींचे आयोजन व्हावे आणि लोकांना फुकटात या शर्यतीचा आनंद लुटता यावा, यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. पण आता संयोजकांना याची जाणीव होऊ लागल्यामुळे पुढील वर्षभर सर्किटवर सपोर्ट शर्यतींची मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे.
नोएडात एक नगर बसवून चढय़ा किमतीने खोल्या विकायच्या, हा बुद्ध इंटरनॅशनल सर्किट बनवण्यामागचा जेपी समूहाचा मुख्य उद्देश. जेपी समूहाचे प्रमुख जयप्रकाश गौर यांना सर्किट आणि फॉम्र्युला-वनविषयी काहीही घेणे-देणे नाही, असे ते जाहीरपणे सांगतात. खोऱ्याने पैसा असलेल्या जेपी स्पोर्ट्स समूहाने केवळ आर्थिक फायद्यासाठी हे सर्किट बनवले आहे, हे यावरून स्पष्ट होते. उत्तर प्रदेश सरकारकडे जितकी जमीन नसेल इतकी जमीन जेपी समूहाच्या मालकीची आहे. त्यामुळे यूपी आणि एमपीपेक्षा जेपी मोठा, अशी चर्चा रंगू लागली आहे. फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी आपले सर्किट भाडय़ाने देणाऱ्या जेपी समूहाने आता मोटारस्पोर्ट्स खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी आपल्या सर्किटचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो, त्याचप्रमाणे देशात फॉम्र्युला-वनची संस्कृती रुजवायची असल्यास, ‘जागो मोहन प्यारे’ हा इशारा इंडियन ग्रां. प्रि.च्या दुसऱ्या पर्वातून संयोजकांना मिळाला असेल.