संक्षिप्त : ला लिगा फुटबॉल : रिअल माद्रिदचा दिमाखदार विजय Print

माद्रिद : गोन्झालो हिग्वेन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिदने मार्लोकावर ५-० असा शानदार विजय मिळवला. रोनाल्डोनो सलग आठव्या सामन्यामध्ये गोल झळकावण्याची किमया केली.  हिग्वेनने आठव्या मिनिटाला गोल करत दणक्यात सुरुवात केली. रोनाल्डोने २२व्या मिनिटाला गोल करत रिअलची आघाडी वाढवली. यानंतर बऱ्याच कालावधीसाठी रिअलला गोलसाठी प्रतीक्षा करावी लागली. ७०व्या मिनिटाला हिग्वेनने पुन्हा एकदा गोल केला. लगेचच रोनाल्डोनेही आपले कौशल्य दाखवत रिअलची आघाडी भक्कम केली.     

खो-खो : महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत
गुडगाव : गुडगाव, हरयाणा येथे सुरू असलेल्या ३२व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकत उपउपांत्य फेरीत आगेकूच केली. १८ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये महाराष्ट्राने झारखंडला २२ विरुद्ध १० असा एक डाव आणि १२ गुणांनी पराभूत केले. दीपेश माधव आणि श्रेयस राऊळ हे विजयाचे शिल्पकार ठरले. मुलींमध्ये महाराष्ट्राने उत्तर प्रदेश संघावर १२-२ असा एक डाव आणि १० गुणांनी विजय मिळवला. निकिता पवार, निकिता गवळी विजयात चमकल्या.    

सरस्वती स्पोर्ट्स क्लब, श्रीसमर्थची विजयी आगेकूच
मुंबई : यूआरएल फाऊंडेशन आयोजित पुरुष-महिला खुला गट मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सरस्वती स्पोर्ट्स क्लब आणि श्रीसमर्थने विजयी आगेकूच केली. पुरुषांच्या गटाच्या अटीतटीच्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने अमर हिंदवर १४-१३ असा एका गुणाने विजय मिळवला. मध्यंतराला सरस्वतीने अमरहिंदवर ७-६ अशी घेतलेली एका गुणाची आघाडी निर्णायक ठरली. कुशल शिंदे, श्रीकांत वल्लाकाठी, प्रवीण जाधव आणि मनीष पगार यांनी अप्रतिम खेळ करत हा विजय साकारला. दुसऱ्या सामन्यात श्रीसमर्थ व्यायाम मंदिराने श्री स्पोर्ट्स क्लबवर १२-८ असा एक डाव आणि ४ गुणांनी पराभव केला. विराज कोठमकर, प्रणय मयेकर, साकेत जेस्ते आणि तेजस शिरसकर हे या विजयात चमकले.    

श्री सह्याद्री, दत्तसेवा पुढील फेरीत
मुंबई : मुंबई उपनगर खो-खो संघटनेच्या पुरुष आणि महिला गटाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत श्री सह्याद्री संघ भांडुप, परांजपे स्पोर्ट्स क्लब, महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी, दत्तसेवा क्रीडा मंडळ यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. श्री सह्याद्री संघाने यजमान प्रबोधन क्रीडाभवनचा १४-१३ असा एका गुणाने पराभव केला. सह्याद्रीतर्फे नचिकेत जाधवने ४ गडी टिपले. अन्य लढतींमध्ये महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाने स्वराज्य प्रतिष्ठानचा तर परांजपे स्पोर्ट्स क्लबने गोयंका एज्युकेशन ट्रस्टवर मात करत पुढच्या फेरीत वाटचाल केली. महिला गटात सह्याद्री क्रीडा मंडळाने गोयंका एज्युकेशनल ट्रस्टचा एक डाव आणि २ गुणांनी पराभव केला. अनुभवी खेळाडू शिल्पा जाधव सह्याद्रीच्या विजयात चमकली. दत्तसेवा क्रीडा मंडळाने महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी ब संघाला ७ गुणांनी नमवले.     

लंगडी : महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
पुणे : लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील तिसऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय लंगडी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने पुरुष आणि महिला दोन्ही गटांत जेतेपदावर नाव कोरले. मुलींच्या गटात महाराष्ट्राने दादरा नगर हवेली संघावर ३६ विरुद्ध ३४ असा २ गुणांनी मात केली. मधुरा पेडणेकर, सिद्धी हरमळकर, मयूरी लोमटे आणि शिवानी गडकरी यांनी सुरेख खेळ करत हा विजय साकारला. मुलांच्या गटात महाराष्ट्राने गोव्याला ३० विरुद्ध २८ असे ५ मिनिटे आणि २ गुणांनी नमवले. यशराज मोरेच्या अप्रतिम खेळाला हिमांशू काळे आणि शुभम गीते यांची उत्तम साथ मिळाली.