भारतीय दौरा आव्हानात्मक - कुक Print

 

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

जवळपास तीस वर्षांपासून आम्हाला एकही मालिका भारतात जिंकता आलेली नाही, त्यामुळे भारतीय दौरा हे आमच्यासाठी फार मोठे आव्हान असेल, असे भारतात दाखल झालेला इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याने सांगितले. इतिहास पाहिला तर भारतीय दौरा आमच्यासाठी फार मोठे आव्हान असणार आहे. आशियाई देशांमध्ये मालिका जिंकणे हे आम्हाला नेहमीच कठीण गेलेले आहे. त्यामुळे पहिल्या तीन सराव सामन्यांमध्ये वातावरणाशी जुवळून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे कुकने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.


तो पुढे म्हणाला की, भारतीय संघाला मायदेशात पराभूत करणे किती कठीण आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारतात मालिका विजय मिळवणे कठीण असून हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. या मार्गात बरेच अडथळे असतील, याची जाणीव मला आहे. पण ही अडथळ्यांची शर्यत आम्ही पार करू, हा विश्वास आमच्या संघात आहे. दोन्ही संघांत गुणवान खेळाडू असून ही मालिका चांगलीच रंगतदार होईल.