मी गोलांसाठी भुकेलेला नाही - मेस्सी Print

पी.टी.आय., माद्रिद

कोणत्याही सामन्यात मी किती गोल करतो यापेक्षाही संघास कसे गोल करता येतील हेच माझे मुख्य ध्येय असते. वैयक्तिक गोल करण्यासाठी मी भुकेलेला नाही असे बार्सिलोना फुटबॉल क्लबचा अव्वल दर्जाचा खेळाडू लिओनेल मेस्सी याने सांगितले. नुकताच त्याला गोल्डन बूट पुरस्कार मिळाला आहे. मेस्सी याने गेल्या मोसमात गोलांचे अर्धशतक नोंदविले होते. गोल्डन बूट पुरस्काराबद्दल तो म्हणाला, हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. सतत मी गोल करण्यासाठी भुकेलेला नसतो. ज्या संघाकडून मी खेळत असतो, त्या संघास कसे गोल करता येतील यावरच माझा भर असतो. माझ्या सहकाऱ्यांना गोल करण्याच्या संधी निर्माण करून देण्यास मी प्राधान्य देतो.
मेस्सी याने आतापर्यंतच्या कारकीर्दीत प्रथम दर्जाच्या  ४१९ सामन्यांमध्ये तीनशेपेक्षा जास्त गोल केले आहेत. त्याला बॅलोन डीओर हा पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे. जगातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूला हा पुरस्कार दिला जातो.
अर्जेन्टिनाने २०१४च्या विश्वचषक पात्रता फेरीत आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये आघाडी स्थान घेतले आहे. त्यामध्ये मेस्सी याच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. संघास विश्वचषक जिंकून देण्याचे माझे ध्येय आहे असे सांगून मेस्सी म्हणाला, या स्पर्धेतील कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. आगामी विश्वचषक स्पर्धा ब्राझीलमध्ये होणार आहे. तेथे विजेतेपद मिळविले तर हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असेल.