पीटरसन आपल्या खेळानेच उत्तर देईल -व्हिव्ह रिचर्ड्स Print

पी.टी.आय., लंडन

काही वर्षांपूर्वी जगविख्यात बॉक्सिंगपटू मोहम्मद अलीवर जोरदार टीका होत होती, पण त्याने त्याकडे लक्ष न देता आपल्या खेळानेच त्यांना उत्तर दिले होते. अलीसारखीच अतुलनीय गुणवत्ता इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनकडे आहे आणि तो टीकाकारांना आपल्या खेळानेच चोख उत्तर देईल, असे मत वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे.
रिचर्ड्स यांनी भारतामध्ये १९७०-८० या कालावधीत सात कसोटी सामने जिंकले होते. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते, तर आता क्रिकेटतज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांना मोहम्मद अली आणि पीटरसन यांच्यातील काही गुण सारखेच असल्याचे जाणवले आहे.
आमच्या काळात जे बोलायचा ते तो करून दाखवायचा, काही लोकांना त्याने पराभूत व्हावं, असं वाटायचं, काही वेळा ते त्याच्या तोंडावर त्याला बोलूनही दाखवायचे. पण तो ‘मीच जिंकणार’ हे बोलून दाखवायचा आणि तसे करूनही दाखवायचा. तशीच गोष्ट पीटरसनची आहे, असे मला वाटते. मोहम्मद अलीसारखीच पीटरसनमध्ये अतुलनीय गुणवत्ता असून तो भारतामधील मालिकेमध्ये निर्णायक ठरू शकतो, असे रिचर्ड्स म्हणाले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर पीटरसनला एका खेळाडूला मोबाइल संदेश पाठवणे फार महागडे ठरले होते. या कारणास्तव त्याला संघातून बाहेर काढण्यात आले होते. ट्वेन्टी-२० विश्वचषकातही त्याची वर्णी संघात लागली नव्हती. त्यानंतर भारतीय दौऱ्यासाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे.