तिवारी की सवारी! Print

भारत  ‘अ’ संघाची ९ बाद ३६९ अशी दमदार मजल
मनोज तिवारीचे शतक सात धावांनी हुकलेअभिनव मुकुंद आणि युवराज सिंग यांची अर्धशतके
प्रशांत केणी, मुंबई

गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईमधील एकदिवसीय सामन्यात मनोज तिवारीने नाबाद शतक झळकावले होते. या शतकानंतरही तब्बल १४ सामने त्याला ‘राखीव’ म्हणून भूमिका पार पाडावी लागली होती. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठीही तिवारीचा भारतीय संघात समावेश होता. परंतु श्रीलंकेत भारतीय फलंदाजी अपयशी होत असतानाही बंगालचा तिवारी अंतिम संघात एकदाही स्थान मिळवू शकला नाही. आता पाहुण्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ निवड करण्याकरिता भारतीय निवड समिती पुढील सोमवारी बैठक घेणार आहे. परंतु तिवारीने आपल्या शानदार सवारीमय खेळीने निवड समितीचे दरवाजे ठोठावले आहेत. याचप्रमाणे कर्करोगासारख्या दुर्दम्य आजारावर मात करून पुन्हा मैदानावर परतलेल्या युवराजनेही खणखणीत अर्धशतक झळकावून सहाव्या क्रमांकासाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. परंतु नैराश्यमय फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना यांनी मात्र ही नामी संधी गमावली आहे.
अभिनव मुकुंद, युवराज यांची अर्धशतके आणि तिवारीचे फक्त सात धावांनी दुर्दैवीरीत्या हुकलेले शतक या बळावर भारत ‘अ’ संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ९ बाद ३६९ धावा अशी दमदार मजल मारली. सकाळच्या सत्रात मुरली विजय (७) आणि रहाणे (४) बाद झाले तरी तामिळनाडूच्या अभिनव मुकुंदने एका बाजूने आक्रमण चालू ठेवले. मुकुंद आणि युवराज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. या दोघांनाही इंग्लंडचा फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानने बाद केले. मुकुंदने ८३ चेंडूंत १६ चौकारांसह ७३ धावा केल्या, तर युवीने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ८० चेंडूंत ५९ धावांची खेळी साकारली. त्याने समित पटेल आणि ग्रॅमी स्वान यांना प्रत्येकी दोन उत्तुंग षटकार ठोकले.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या तिवारीने २०२ मिनिटे आणि १५० चेंडू निर्धाराने किल्ला लढवत १२ चौकारांसह ९३ धावांची संयमी खेळी साकारली. मजल-दरमजल करीत तो शतकासमीप जात असताना ब्रेसननने त्याचा त्रिफळा उडवला आणि त्याचे शतक होऊ दिले नाही. तिवारीला ५ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा काढणाऱ्या इरफान पठाणने छान साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांत आर. विनय कुमारने तासभर किल्ला लढवत २ चौकार आणि जेम्स अँडरसनला झळकावलेल्या षटकारासह नाबाद २५ धावा काढून इंग्लिश गोलंदाजांना त्रस्त केले. विनय कुमार आणि परविंदर अवाना या भारताच्या अखेरच्या जोडीने संयमाने फलंदाजी केली. अखेरच्या सत्रात धावचीत करून अखेरची जोडी फोडण्याची संधी गमावल्यामुळे अँडरसन कमालीचा संतप्त झाला आणि त्याने चक्क मधली यष्टीच एका हाताने उडवून दुसऱ्या हातात पकडली. त्यानंतर अँडरसन आणि विनय यांचे मैदानावरही क्षणभर वाक्युद्ध रंगले.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ : ९० षटकांत ९ बाद ३६९ (अभिनव मुकुंद ७३, युवराज सिंग ५९, मनोज तिवारी ९३, इरफान पठाण ४६; टिम ब्रेसनन ३/५९, ग्रॅमी स्वान ३/९०).        
सहा मिनिटे निर्णयाची!
अजिंक्य रहाणे बाद असल्याचा कौल देण्यासाठी सामनाधिकारी एस. शरथ यांनी चक्क सहा मिनिटे घेतली. वेगवान गोलंदाज टिम ब्रेसननच्या गोलंदाजीवर केव्हिन पीटरसनने त्याचा झेल टिपला. पण मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपविला. परंतु रहाणेला बाद देण्यासाठी शरथ यांना बराच वेळ लागला. मैदानावरील इंग्लिश खेळाडूंनी एवढय़ा वेळात चुळबूळ सुरू केली. त्यावेळी पुढील फलंदाज युवराज सिंग मात्र सीमारेषेच्या आत येऊन तयार होता. अखेर सहा मिनिटांनंतर रहाणे बाद झाल्याचे घोषित झाल्यानंतर सर्वाना हायसे वाटले.                         
इंग्लंडचा तिसरा सराव सामना हरयाणाशी
भारताशी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीआधी होणारा तिसरा आणि अखेरचा सराव इंग्लंडचा संघ हरयाणाशी खेळणार आहे. अहमदाबादच्या सरदार पटेल मोटेरा स्टेडियमवर ८ नोव्हेंबरपासून हा चार दिवसीय सराव सामना होणार आहे. रणजी करंडक स्पध्रेत ब गटात समावेश असलेल्या उत्तरेच्या हरयाणा संघाचा पहिला साखळी सामना रोहटक येथे २ नोव्हेंबरपासून विदर्भविरुद्ध होणार आहे.       
  मी कसोटी क्रिकेटसाठी
     सज्ज -तिवारी
‘‘मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालो आहे. सहाव्या क्रमांकासाठी मोठी चुरस आहे. पण हा निर्णय निवड समितीला घ्यायचा आहे. मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करीन. पाहुया काय होतेय,’’ अशी प्रतिक्रिया मनोज तिवारीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ‘‘शतक हुकल्यामुळे मी निराश नक्कीच झालो आहे. पण माझ्या कामगिरीबाबत मात्र मी समाधानी आहे. खेळपट्टीवर प्रदिर्घ काळ थांबण्याचाच माझा निर्धार होता. मी संधीच्याच प्रतीक्षेत होतो,’’ असे तिवारी पुढे म्हणाला. संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनीही तिवारी आणि युवराज सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

  स्टीव्हन फिन दुखापतग्रस्त
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला पहिल्या सत्रातच मैदान सोडावे लागले. क्षेत्ररक्षण करीत असताना फिनला दुखापत झाल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्यामुळे पहिल्या दिवशी तो फक्त चार षटकेच गोलंदाजी करू शकला. फिनची तपासणी झाल्यावरच त्याच्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होईल, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांकडून समजते.