भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला हिरवा कंदील Print

पी.टी.आय., नवी दिल्ली

मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका येत्या डिसेंबरमध्ये खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाकिस्तान क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे केवळ आशिया खंडातच नव्हे तर अवघ्या क्रिकेटविश्वाची उत्कंठा वाढवणाऱ्या भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पध्र्यामधील सामन्यांचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान येणाऱ्या विश्रांतीकाळात पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर येईल.

डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ादरम्यान भारत आणि पाकिस्तानदरम्यान तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी-ट्वेंटी सामने होणार आहेत. या वर्षी जुलैमध्ये बीसीसीआयने याबाबतची घोषणा करून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठवला होता. त्यानुसार, बीसीसीआयच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांची भेट घेतली असता त्यांनी या दौऱ्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, असे सांगितले. पाकिस्तानी क्रिकेट प्रेक्षकांना तसेच नामवंत पाकिस्तानी नागरिकांना सामने पाहण्यासाठी भारताचा व्हिसा देण्याची तयारी गृहमंत्रालयाने दर्शवली आहे.