‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमकेचा राष्ट्रीय विक्रम; किसन तडवीलाही सुवर्ण Print

राष्ट्रीय कनिष्ठ अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा    
प्रतिनिधी,  नाशिक

‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमके, संजीवनी जाधव आणि किसन तडवी या नाशिकच्या युवा धावपटूंनी लखनौ येथे सुरू असलेल्या २८ व्या अखिल भारतीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला. अंजनाने पुन्हा एकदा आपल्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिची आणि याआधी ६०० मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नाशिकच्याच दुर्गा देवरेची ‘सर्वोत्कृष्ठ खेळाडू’ म्हणून निवड झाली आहे.
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतच्या यशामुळे बहरलेल्या येथील अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात बुधवारचा दिवस एक ‘सोनेरी दिन’ ठरला. राष्ट्रीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राकडून सहभागी झालेल्या दुर्गा देवरेने प्रथम १४ वर्षांआतील गटात ६०० मीटरमध्ये १:३६ सेकंद अशी वेळ नोंदवित सुवर्ण मिळविले. त्यानंतर बुधवारी किसन तडवीने १६ वर्षांआतील गटात तीन हजार मीटरचे अंतर ८:४४:७१ या वेळेत कापत नवीन स्पर्धा विक्रम नोंदविला. याआधीचा विक्रम मणिपूरच्या जॉय कुमारच्या नावावर होता. त्याने १९९६ मध्ये ८:४७:२० अशी वेळ नोंदविली होती. स्पर्धेत सर्वाधिक लक्षवेधक कामगिरी अपेक्षेप्रमाणे ‘गोल्डन गर्ल’ म्हणून नावारूपास आलेल्या अंजना ठमकेकडून झाली. अंजनाने १६ वर्षांआतील गटात ४०० मीटरचे अंतर अवघ्या ५४ : ५७ सेकंदात कापत नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. याआधीचा विक्रम कर्नाटकच्या एन. आर. पुनाव्वा हिच्या नावावर होता. तिने २००५ मध्ये ५५:४३ सेकंद अशी वेळ दिली होती. अंजनाने आतापर्यंत ज्या स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे, त्या प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. अंजना आणि दुर्गा यांची त्यांच्या गटांमधील ‘सर्वोत्कृष्ठ खेळाडू’ म्हणून निवड करण्यात आली. नाशिकच्याच संजीवनी जाधवने १८ वर्षांआतील गटात तीन हजार मीटरमध्ये १०:२५ अशी वेळ नोंदवित रौप्यपदक मिळविले. हे सर्व खेळाडू भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.