कुक कर्ता, दु:खहर्ता..! Print

 

* भारतीय ‘अ’ संघाच्या ३६९ धावसंख्येला इंग्लंडचे ४ बाद २८६ असे प्रत्युत्तर
* कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने साकारले नाबाद शतक
* जोनाथन ट्रॉट, समित पटेलची अर्धशतके
प्रशांत केणी, मुंबई

अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या साथीनेच अ‍ॅलिस्टर कुकने सुमारे सहा वष्रे इंग्लंडच्या सलामीची धुरा वाहिली. स्ट्रॉसकडून त्याने नेतृत्वाचे धडेही गिरवले. त्यामुळेच स्ट्रॉसच्या निवृत्तीनंतर कर्णधारपदाची धुरा आपसूकच कुककडे सोपविण्यात आली. आता भारताविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका हा कुकसाठीचा पहिला कठीण पेपर, पण हा पेपर सोडविण्यासाठी आपली चांगलीच पूर्वतयारी झाली आहे, असा इशारा कुकने आपल्या शानदार नाबाद शतकानिशी दिला. कुकने समित पटेलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी नाबाद १५३ धावांची भागीदारी रचून इंग्लंडला सुस्थितीत नेले. पहिल्या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने भारताच्या पहिल्या डावातील ३६९ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ४ बाद २८६ अशी मजल मारली होती.


२००६ मध्ये अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्या वेळी नागपूर कसोटी सामन्यात कुकने पदार्पणातच आपल्या खेळाची चुणूक भारतीय खेळपट्टय़ांवर दाखवली होती. त्या अनिर्णीत कसोटी कुकने पहिल्या डावात ६० तर दुसऱ्या डावात (नाबाद १०४) आपले पहिले कसोटी शतक साजरे केले होते. आता सहा वर्षांनी इंग्लंडचा कर्णधार म्हणून कुक पुन्हा भारतीय भूमीवर आला आहे, ते इंग्लंडसाठी एक सुवर्णस्वप्न घेऊन. बुधवारी उपाहारानंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेंडू चांगलेच वळायला लागले आणि इंग्लंडची ४ बाद १३३ अशी केविलवाणी अवस्था झाली. कामचलाऊ फिरकी गोलंदाज युवराज सिंग आणि सुरेश रैना आता इंग्लंडला ‘फिरकी चक्कर’मध्ये अडकवणार अशी लक्षणे दिसू लागली, पण कप्तान कुक डगमगला नाही. त्याने सव्वा पाच तास मैदानावर किल्ला लढवून २५१ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ११२ धावांची महत्त्वाची खेळी साकारली. त्याला मोलाची साथ देणाऱ्या समित पटेलने १२ चौकारांसह नाबाद ८२ धावा काढल्या.
त्याआधी, सकाळच्या सत्रात मंगळवारच्या ३६९ धावसंख्येवरच इंग्लंडने भारताचा डाव गुंडाळला. त्यानंतर इंग्लंडचा सलामीवीर निक कॉम्पटनने (०) निराशा केली. मग कुकने जोनाथन ट्रॉटच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करीत खिंड लढवली. उपाहारानंतर ट्रॉटने अर्धशतक साजरे केले, पण रैनाने त्याला स्थिरावू न देता तंबूची वाट दाखवली. युवीनेही मग खेळपट्टीचा अचूक फायदा घेत केव्हिन पीटरसन (२३) आणि इयान बेल (५) हे महत्त्वाचे इंग्लिश फलंदाज बाद करण्यात यश मिळवले, पण कुक मात्र भारतीय वेगवान आणि फिरकी माऱ्याला निर्धाराने सामोरा गेला. रैनाला एकेरी धाव घेत कुकने आपले शतक पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ (पहिला डाव) : ३६९
इंग्लंड (पहिला डाव) : ८७ षटकांत ४ बाद २८६ (अ‍ॅलिस्टर कुक खेळत आहे ११२, जोनाथन ट्रॉट ५६, समित पटेल खेळत आहे ८२; युवराज सिंग २/५२, सुरेश रैना १/४३).

निक कॉम्पटनकडून निराशा
माजी कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या निवृत्तीनंतर आता भारताविरुद्धच्या मालिकेच्या दृष्टीने २९ वर्षीय निक कॉम्पटनला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडचे महान क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा नातू ही निकची ओळख, पण बुधवारी ब्रेबॉर्नवर फक्त तीन चेंडूंचा सामना तो करू शकला आणि भोपळाही फोडण्यात त्याला अपयश आले. अशोक दिंडाने त्याला दुसऱ्याच षटकात बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या दरबानमध्ये जन्मलेल्या निकने शालेय, महाविद्यालयीन आणि मग इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. स्ट्रॉसच्या जागेकरिता म्हणूनच कॉम्पटनला संधी देण्यात आली आहे.