आर्सेनेलचा थरारक विजय Print

पी.टी.आय., लंडन

आर्सेनेलने लीग चषकात चार गोलने पिछाडीवर पडल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत रीडिंगवर ७-५ने मात केली. थिओ वॉलकॉट या विजयाचा शिल्पकार ठरला. ९५व्या मिनिटाला वॉलकॉटने गोल केला आणि बरोबरी झाली. अतिरिक्त वेळेत वॉलकॉटने निर्णायक गोल करत आर्सेनेलला शानदार विजय मिळवून दिला.
आर्सेनेलचे व्यवस्थापक वेंजर यांनी क्वीन्स पार्क रेंजर्सविरुद्ध आर्सेनेलचा संघ पूर्णत: बदलला. रीडिंगने मध्यंतरापर्यंत वर्चस्व गाजवले. जेसन रॉबर्ट्स, लॉरेन्ट कोसेन्ली, मिकेली लेइगर्टवूड, नोएल हंट यांनी प्रत्येकी एक गोल केल्याने मध्यंतराला रीडिंगकडे ४-० अशी आघाडी होती. परंतु त्यानंतर थिथो वॉलकॉटने आर्सेनेलचे खाते उघडले. ऑलिव्हर गिरोऊड आणि लॉरेन्ट कोसेन्ली यांनी प्रत्येकी एक गोल करत आर्सेनेलचे आव्हान जिवंत ठेवले. वॉलकॉटने निर्णायक गोल करत बरोबरी करून दिली. चमखने गोल करत आर्सेनेलना आघाडी मिळवून दिली. यानंतर रीडिंगच्या पॅव्हेल पॉगरयान्कने गोल करत सामना रंगतदार बनवला. वॉलकॉटने अतिरिक्त वेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना गोल करत आर्सेनेलला विजयाच्या समीप नेले. चमखने गोल करत आर्सेनेलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.