निको हल्केनबर्ग करणार फोर्स इंडियाला अलविदा Print

पुढच्या मोसमात सौबरसाठी खेळणार
पी.टी.आय., नवी दिल्ली

शर्यतपटू निको हल्केनबर्ग फोर्स इंडियाची साथ सोडणार, पुढच्या हंगामात सौबरसाठी खेळणार, अशा उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. अखेर बुधवारी निकोच्या फोर्स इंडियाला अलविदा करण्यावर शिक्कामोर्तब झाले. अपेक्षेप्रमाणेच पुढच्या हंगामात तो सौबर संघाचा सदस्य असणार आहे. यासंदर्भात सौबरने अधिकृत घोषणा केली.
२५ वर्षीय जर्मन निकोने २०१० मध्ये फॉम्र्युला वनमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला विल्यम्स संघाचा सदस्य असणाऱ्या निकोने पहिल्याच वर्षी पोल पोझिशन पटकावली होती. २०११ मध्ये निकोने फोर्स इंडिया संघात राखीव शर्यतपटू म्हणून दाखल झाला होता. या वर्षी निकोची आड्रियन सुटिलच्या जागी मुख्य शर्यतपटू म्हणून नियुक्ती झाली होती.
निकोच्या प्रदर्शनाकडे आमचे लक्ष होते. त्याची कामगिरी निश्चितच चांगली झाली होती. २०१० मध्ये इंटरलागोसमध्ये खडतर परिस्थितीतही पोल पोझिशन पटकावली होती.
संधी मिळाल्यास सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची त्याची क्षमता आहे. त्याच्या प्रयत्नांना शिस्तबद्ध सांघिक प्रयत्नांची जोड लाभल्यास सौबरसाठी चांगले असल्याचे सौबरचे मुख्य संघ व्यवस्थापक मोनिशा कालटेनबॉर्न यांनी सांगितले.
या वर्षीच्या ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये हल्केनबर्ग ४९ गुणांसह बाराव्या स्थानी आहे. अजूनही तीन शर्यती बाकी असल्याने आगेकूच करण्याची त्याला संधी आहे. बेल्जियम ग्रां.प्रि.मध्ये चौथे स्थान पटकावत निकोने आपली सवरेत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती.     
अबुधाबी सर्किट आम्हाला अनुकूल- फोर्स इंडिया
अबुधाबी येथील यास मरिना सर्किट आमच्या खेळाला अनुकूल आहे, त्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या शर्यतीत आमचे प्रदर्शन निश्चित चांगले होईल, असा विश्वास फोर्स इंडियाच्या शर्यतपटूंनी व्यक्त केला. यंदाच्या हंगामात दुसऱ्या सत्रात फोर्स इंडियाची कामगिरी झाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर अबुधाबी येथे चांगली कामगिरी करण्याचा फोर्स इंडियाचा प्रयत्न असेल. अबुधाबी सर्किटमध्ये फसवी वळणं आहेत, या वळणांवर कमी वेगाने वाटचाल करत आगेकूच करावी लागते. अशा सर्किटवर आमची कामगिरी चांगली होते, त्यामुळे या वेळीही दमदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असल्याचे निको हल्केनबर्गने सांगितले.