भारताच्या मुली हुश्शार! Print

आशिया क्रिकेट चषकाला भारतीय महिलांची गवसणी
पी.टी.आय., गुआंगझाऊ

ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताच्या पुरुषांच्या संघाला आपली छाप पाडता आली नसली तरी महिलांनी मात्र आशिया चषक ट्वेन्टी-२० चषकाला गवसणी घालत देशवासीयांना छनशी भेट दिली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत करत भारतीय महिलांनी विजयाचा सुवर्णाध्याय लिहिला. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांना ८१ धावाच करता आल्यावर त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्याचे काही जणांना वाटले. पण अचूक आणि भेदक मारा करत त्यांनी पाकिस्तानच्या संघाला ६३ धावांत गुंडाळत आशिया चषकावर भारताचे नाव कोरले.
भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी पहिल्या दोन षटकांमध्येच आपले सलामीवीर गमावले. २ बाद ४ धावांवारून पूनम राऊत (२५) आणि हरमनप्रीत कौर (२०) यांनी  पडझड थांबवली खरी, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ठराविक फरकाने भारताच्या विकेट्स पडत गेल्या आणि २० षटकांत सर्व फलंदाज ८१ धावांत तंबूत परतले.
विजयासाठी ८२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या ठराविक अंतराने बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. अर्चना दास आणि एन. निरंजना यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर सुलक्षणा नाईकने दोन यष्टिचीत आणि दोन झेल घेत आपली कमाल दाखवली. पाकिस्तानच्या दोन फलंदाजांनाच फक्त दोन अंकी धावसंख्या उभारता आली.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत सर्वबाद ८१ (पूनम राऊत २५, हरमनप्रीत कौर २०; साना मिर ४/१३) विजयी वि. पाकिस्तान : १९.१ षटकांत सर्व बाद ६३ (नैन अबिदी १३;
अर्चना दास २/१२, एन. निरंजना  २/१५).