फिनच्या दुखापतीची इंग्लंडला चिंता Print

मुंबई : मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे इंग्लंडचा सहा फूट, सात इंच उंचीचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन सध्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या सराव सामन्यात खेळू शकणार नाही, हे बुधवारी सकाळीच स्पष्ट करण्यात आले. १५ नोव्हेंबरपासून अहमदाबादला प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर फिनच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या कॅम्पमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पहिल्याच सत्रात फिनला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मिडलसेक्सच्या २३ वर्षीय फिनने चारच षटके गोलंदाजी केली होती. मंगळवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणीअंती फिनची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले, परंतु संघाच्या डॉक्टरांनी फिनला उर्वरित सामन्यात न खेळण्याचा सल्ला दिला आहे.
‘‘स्टीव्हन फिनच्या उजव्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे पहिल्या सराव सामन्याला आता त्याला मुकावे लागणार आहे. आता पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत पुढील दोन दिवस त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी करण्यात येईल,’’ असे इंग्लंड संघाच्या प्रवक्त्या ऱ्हियान इव्हान्स यांनी सांगितले. २०१०मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या फिनच्या खात्यावर १६ कसोटी सामन्यांत ६६ बळी जमा आहेत. याशिवाय त्याने तीनदा पाच बळी घेण्याची किमया साधली आहे.
इंग्लंडच्या संघाने बदली खेळाडूला भारतात बोलावलेले नाही, परंतु अहमदाबाद कसोटीत खेळण्यासाठी फिनला उर्वरित दोन सराव सामन्यांपैकी किमान एका सामन्यात खेळणे आवश्यक आहे. पाहुणा इंग्लिश संघ नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर शनिवारपासून मुंबई ‘अ’ संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबरपासून अहमदाबादला हरयाणा संघाविरुद्ध चार दिवसांचा तिसरा सराव सामना खेळणार आहे.