संक्षिप्त : केर्न्‍सविरुद्धच्या खटल्यात ललित मोदींची हार Print

लंडन : न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ख्रिस केर्न्‍स याने दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाईच्या खटल्यात ललित मोदी यांनी केलेले अपील येथील न्यायालयाने फेटाळले असून, मोदी यांनी केर्न्‍सला ९० हजार युरो त्वरित द्यावेत असा निकाल दिला आहे. केर्न्‍स हा मॅचफिक्सिंगमध्ये गुंतला असल्याचा आरोप ललित मोदी यांनी केला होता. या आरोपांना आव्हान देत केर्न्‍सने येथे न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात केर्न्‍सविरुद्ध पुरावे देण्यात मोदी हे असमर्थ ठरले, त्यामुळे केर्न्‍सला नुकसान भरपाई द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्याविरुद्ध मोदी यांनी आव्हान अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला व मोदी यांनी त्वरित केर्न्‍सला रक्कम द्यावी असा निकाल दिला आहे. केर्न्‍स याने २००७ व २००८ मध्ये इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंडीगढ लायन्स संघाचे नेतृत्व केले होते. आयपीएलच्या तिसऱ्या स्पर्धेच्या वेळी केर्न्‍सने मॅचफिक्सिंग केले असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.    

राष्ट्रीय कुमारी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला जेतेपद
मुंबई : गुरगांव (हरियाणा) येथील राष्ट्रीय कुमारी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने केरळचा पराभव करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या संघातील नगरची खेळाडू श्वेता गवळी हिने स्पर्धेत सवरेत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवरील खो-खोचा या गटातील सर्वोच्च जानकी पुरस्कार जिंकला. तिच्या या कामगिरीबद्दल नगरच्या क्रीडा क्षेत्रात जल्लोष करण्यात आला.स्पर्धेत आज झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचा सात गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्वेता गवळी हिने पहिल्या डावात ४ मिनिटे व दुसऱ्या डावात २ मिनिटे ४५ सेकंद खेळ करीत १ गडीही बाद केला.    

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स : अंजनाचा विक्रम; किसनला सुवर्ण
 नाशिक : ‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमके, संजीवनी जाधव आणि किसन तडवी या नाशिकच्या युवा धावपटूंनी लखनौ येथे सुरू असलेल्या २८ व्या अखिल भारतीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला. अंजनाने पुन्हा एकदा आपल्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिची आणि याआधी ६०० मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नाशिकच्याच दुर्गा देवरेची ‘सर्वोत्कृष्ठ खेळाडू’ म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रीय कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राकडून सहभागी झालेल्या दुर्गा देवरेने प्रथम १४ वर्षांआतील गटात ६०० मीटरमध्ये १:३६ सेकंद अशी वेळ नोंदवित सुवर्ण मिळविले. त्यानंतर बुधवारी किसन तडवीने १६ वर्षांआतील गटात तीन हजार मीटरचे अंतर ८:४४:७१ या वेळेत कापत नवीन स्पर्धा विक्रम नोंदविला.     

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट : मुंबई विजयी
मुंबई : ऑल इंडिया सुपर लीग १९ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबईने बंगालवर मात केली. प्रथम फलंदाजी करताना बंगालचा डाव ८६ धावांतच संपुष्टात आला. सारिका कोळी, सानिया राऊत, मानसी धुरी आणि ह्युमेरा काझीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. हेमाली बोरवणकरच्या ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने हे लक्ष्य आठ विकेट राखून २७व्या षटकांतच पूर्ण केले.    

मुंबई महिला संघाची घोषणा
मुंबई : पश्चिम विभागाच्या एकदिवसीय लढतींसाठी मुंबई महिलांच्या वरिष्ठ संघाची घोषणा करण्यात आली. बडोदा येथे ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. मुंबई संघ : सुनेत्रा परांजपे (कर्णधार), शेरल रोझारिओ, भक्ती तामोरे, अपूर्वा कोकिळ, रितिका भोपाळकर, निर्मला शाही, नॅन्सी दारुवाला, सोनाली कुंभारे, श्रद्धा चव्हाण, प्राजक्ता शिरवाडकर, क्रेसिंडा डीकॉस्टा, नाजुका दवणे, अक्षदा पाध्ये, भाग्यश्री संकड, प्रतीक्षा कदम.    

स्पोर्ट्स्टार करंडक  : खंडू रांगणेकर संघ विजयपथावर
मुंबई : स्पोर्ट्स्टार करंडक एमसीए १९ वर्षांखालील निवड चाचणी स्पर्धेत खंडू रांगणेकर संघाने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. पहिल्या डावात १४ धावांची आघाडी घेणाऱ्या रांगणेकर संघाने दत्तू फडकर संघाचा दुसरा डाव १७८ धावांत गुंडाळला. सागर मिश्राने ४१ धावांत ४ बळी टिपले. विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य मिळालेल्या रांगणेकर संघाने बिनबाद १० अशी मजल मारली आहे. दुसऱ्या सामन्यात विजय र्मचट संघाने ८ बाद २६७ वर डाव घोषित केला. विजय मांजरेकर संघाने दुसऱ्या डावात बिनबाद ९० केल्या आहेत.     

खो-खो : श्री समर्थ, विद्यार्थी क्रीडा केंद्र आमने-सामने
मुंबई : यूआरएल फाऊंडेशन आयोजित मुंबई जिल्हा पुरुष आणि महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर आणि विद्यार्थी क्रीडा केंद्र यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. महिलांमध्ये श्री समर्थ समोर शिवनेरी सेवा मंडळाचे आव्हान आहे. पुरुष गटात विद्यार्थी क्रीडा केंद्र परळने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरला १३ विरुद्ध ११ असा २ गुणांनी पराभव केला. गेली १२ वर्षे अंतिम फेरीत खेळणारा ओम समर्थच्या संघाला यंदा मात्र उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. विद्यार्थीतर्फे सागर तेरवणकर, क्षितिज भोसले आणि पराग आंबेकर यांनी शानदार खेळ केला. श्री समर्थ व्यायाम मंदिरने सरस्वती स्पोर्ट्स क्लबवर १८ विरुद्ध ११ अशी ६ गुणांनी विजयश्री संपादन केली. सव्वा वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या साकेत जेस्तेने दमदार पुनरागमन केले. महिलांमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिरने पवन स्पोर्ट्स क्लबवर एक डाव आणि ३ गुणांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने सरस्वती स्पोर्ट्स क्लबला ८ विरुद्ध ५ अशी ३ गुणांनी नमवले.     

खो-खो : श्रीसह्य़ाद्री, परांजपे स्पोर्ट्स क्लब अजिंक्य
मुंबई : प्रबोधन क्रीडाभवन गोरेगाव येथे आयोजित मुंबई उपनगर जिल्हा पुरुष आणि महिला अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत पुरुष गटात भांडुपच्या श्री सह्य़ाद्रीने तर महिला गटात परांजपे स्पोर्ट्स क्लबने जेतेपद पटकावले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात श्री सह्य़ाद्रीने रंगतदार सामन्यात सह्य़ाद्री चेंबूरला एका गुणाने नमवले. प्रणय राऊळ, विष्णू मांजरेकर आणि पराग परब श्री सह्य़ाद्रीच्या विजयात चमकले. महिला गटात परांजपे स्पोर्ट्स क्लबने सह्य़ाद्री क्रीडा मंडळ चेंबूरचा एक डाव आणि ४ गुणांनी पराभव केला. कीर्ती चव्हाण, श्रुती सपकाळ, मयुरी पेडणेकर यांनी सुरेख खेळ केला.     
बॅडमिंटन प्रशिक्षक अभ्यासक्रम
मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने बॅडमिंटन प्रशिक्षकांसाठी एका नव्या अभ्यासक्रमाची घोषणा केली. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. विविध जिल्ह्यांमध्ये, खाजगी तसेच सरकारी शालेय, महाविद्यालयीन स्तरावरच्या प्रशिक्षकांसाठी हा अभ्यासक्रम असणार आहे. या प्रशिक्षकांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्यांना संघटनेतर्फे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र देण्यात येईल. संघटनेच्या प्रमाणपत्राला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय बॅडमिंटन संघटनची मान्यता असणार आहे. या अभ्यासक्रमाचे स्वरुप आणि नियोजनाची जबाबदारी ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गंधे यांनी सांगितले.     

चेस मास्टर ४ नोव्हेंबरला
मुंबई : आसमंत फाऊंडेशनने येत्या ४ नोव्हेंबर रोजी चेस मास्टर जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा मुंबई बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने दादर पश्चिमेला छबिलदास हायस्कूलमध्ये रंगणार आहे. आसमंत फाऊंडेशनने या स्पर्धेतही २५ हजार रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत. स्पर्धेतील विजेत्या ‘चेस मास्टर’ला रोख ५ हजार रुपयांचे बक्षीस आणि आकर्षक चषक दिला जाईल.  इच्छुकांनी ९३२३८८३१३४, ९३२०४०५९२५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.