बलात्काराच्या आरोपांमुळे युनायटेडकडून फुटबॉलपटू बलदेवसिंगची हकालपट्टी Print

पी.टी.आय., कोलकाता
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या बलदीपसिंगला युनायटेड स्पोर्ट्स क्लबने डच्चू दिला आहे. मात्र या आरोपाखाली संशयित असलेला जगप्रीतसिंग याची मात्र ईस्ट बंगाल संघाने पाठराखण केली आहे.
बलदीपसिंग व जगदीपसिंग यांच्याबरोबरच ईस्ट बंगालचा माजी खेळाडू जसपाल परमार व त्याचा आचारी रवीसिंग यांच्याविरुद्ध येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनी एका चौदा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी जगप्रीत व रवीसिंग यांना अटक केली असून त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. जसपाल व बलदीप हे फरारी झाले आहेत.
युनायटेड क्लबचे संचालक नवाब भट्टाचार्य यांनी सांगितले, आम्ही तत्काळ बलदीप याच्याबरोबर केलेला करार रद्द केला आहे. जोपर्यंत तो निदरेष असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत तरी त्याला क्लबकडून खेळता येणार नाही.
ईस्ट बंगाल क्लबचे सरचिटणीस कल्याण मजुमदार यांनी सांगितले, घटना घडली त्यावेळी जगप्रीत हा आयलीग स्पर्धेतील पुणे क्लबविरुद्ध सामन्यासाठी उपस्थित होता. तो निदरेष असल्याचे आमचे मत आहे आणि त्यामुळेच आम्ही त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
जसपाल परमार याने साळगावकर क्लबला रामराम ठोकून ईस्ट बंगालचे सदस्यत्व घेतले होते मात्र दोन आठवडय़ांपूर्वीच त्याने या क्लबकडून आपल्याला मुक्त करण्याची विनंती केली होती व त्यानुसार त्याला करारातून मुक्त करण्यात आले होते.
तीन फुटबॉलपटूंसह चौघांनी उत्तर कोलकाता परिसरात असलेल्या एका इमारतीत या मुलीला सदनिका स्वच्छ करण्याचे काम देण्याच्या आमिषाने नेले व तेथे सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार या मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.