पाकिस्तानी शरीरसौष्ठवपटूंसाठी भारतीय संघटना प्रयत्नशील Print

प्रसाद लाड, मुंबई
लुधियानामध्ये शुक्रवारपासून (२ नोव्हेंबर) रंगणाऱ्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत पाकिस्तानच्या शरीरसौष्ठपटूंना आणण्यासाठी भारतीय शरीरसौष्ठव महासंघ प्रयत्नशील आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर शरीरसौष्ठवपटूंनाही भारतातील स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी, अशी भावना दर्दी शरीरसौष्ठव चाहत्यांच्या मनात आहे.
या स्पर्धेसाठी भारताबरोबर अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, मालदिवमधून स्पर्धक येणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय महासंघाने पाकिस्तानच्या संघटनेला या संदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर पाकिस्तान शरीरसौष्ठव संघटनेकडूनही भारताच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळली आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयानेही पाकिस्तानच्या शरीरसौष्ठवपटूंना भारतात येण्यास परवानगी दिली असून आता गृह मंत्रालयावर सारे काही अवलंबून आहे, असे एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
भारतीय महासंघाने पाकिस्तानच्या शरीरसौष्ठपटूंच्या स्वागतासाठी खास आयोजन केले आहे. पाकिस्तानच्या शरीरसौष्ठवपटूंना वाघा बॉर्डरवरून भारतात आणण्याचे आम्ही ठरवले असून जागतिक क्रीडा विश्वासाठी हा एक अविस्मरणीय क्षण असेल, असे संघटनेमधील एका सूत्रांनी सांगितले.
याबाबत संघटनेचे सचिव चेतन पाठारे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या शरीरसौष्ठवपटूंना दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याबाबतची सर्व कागपदपत्रे आम्ही सरकारला पाठवली असून त्यांच्या निर्णयाकडे आमचे लक्ष लागलेले आहे.
दोन्ही देशांमध्ये सलोख्याचे संबंध राहावेत यासाठी भारत सरकारने क्रिकेटपटूंना येण्याची परवानगी दिली, आता शरीरसौष्ठवलाही समान न्याय गृह मंत्रालय देईल का, याकडे तमाम शरीरसौष्ठव चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.