हरभजन सिंग मुंबई इंडियन्सकडेच Print

पी.टी.आय., नवी दिल्ली

हरभजन सिंगला यापुढेही आपल्या ताफ्यात ठेवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने घेतला आहे. या निर्णयामुळे हरभजन सिंगला मुंबई इंडियन्स व्यवस्थापन डच्चू देणार या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स पुढच्या आयपीएल हंगामासाठी काही खेळाडूंना डच्चू देणार आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत हरभजनचे नाव नाही.हरभजनचा ढासळता फॉर्म आणि वाढते वय यामुळे मुंबई इंडियन्स येत्या हंगामासाठी त्याचा विचार करणार नाही अशा अफवांना ऊत आला होता. ‘या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. हरभजन आमच्या संघाचा अविभाज्य घटक आहे. पहिल्या हंगामापासून तो आमच्या संघाचा भाग आहे आणि संघाच्या यशस्वी वाटचालीत त्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी त्याच्या भवितव्याबाबत कधीही प्रश्न नव्हता’ असे आयपीएलशी संलग्न अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान आयपीएलमधील विविध संघ ज्या खेळाडूंना डच्चू देणार आहेत, त्या खेळाडूंची यादी बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेली नाही.