युवराजच्या कसोटी पुनरागमनावर धोनीमुळे संक्रांत ? Print

नवी दिल्ली, पी.टी.आय.

कर्करोगाची लढाई जिंकून मैदानात परतलेल्या आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचे स्वप्न भारताचा लाडका डावखुरा फलंदाज युवराज सिंग पाहात आहे, पण त्याचे हे स्वप्न बेचिराख होऊ शकते, असा सूचक इशारा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चाणाक्षपणे दिला आहे. युवराज चांगली फलंदाजी करत असला तरी तो दोन दिवस क्षेत्ररक्षण करू शकतो का, हा मुद्दा मांडत धोनीने युवराजच्या कसोटी पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून धोनी आणि त्याचे चाणाक्ष राजकारण पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहे.


युवराजच्या तंदुरूस्तीबाबत बोलणे मला कठीण वाटत आहे. कसोटी हा क्रिकेटचा एक वेगळा प्रकार आहे, तुम्ही एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटशी त्याची तुलना करू शकत नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती असते की, ५० षटकेच तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचे आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी दोन दोन दिवसही क्षेत्ररक्षण करावे लागते. त्यामुळे युवराज दोन दिवस क्षेत्ररक्षण करू शकतो का, हे पाहावे लागेल, असे धोनी म्हणाला.
सध्या भारतीय संघात सहाव्या स्थानासाठी कडवी स्पर्धा पाहायला मिळते आहे. या स्थानावर धोनीचा लाडका सुरेश रैना असून ही जागा स्थानिक क्रिकेट कामगिरीच्या जोरावर युवराज पटकावू पाहात आहे. त्याचबरोबर या क्रमांकासाठी मनोज तिवारीनेही आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे रैनाला संघात कायम ठेवण्यासाठी धोनीने हे वक्तव्य केले असल्याची शंका काही क्रिकेटतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
तो पुढे म्हणाला की, युवराजला त्याच्या क्षेत्ररक्षणाबद्दल अधिक माहिती असेल. तो काही स्थानिक सामने खेळला आहे आणि तो फॉर्म कायम ठेवण्यासाठी तो प्रयत्न करेल.
विराट कोहली आणि हरभजन सिंग यांच्यापोठापाठ धोनीनेही खेळपट्टीबाबत वक्तव्य केले आहे. धोनी याबाबत म्हणाला की, आमच्यासाठी काय चांगले आहे याची कल्पना क्युरेटरला असते. ‘स्पोर्टिग’ खेळपट्टय़ा म्हणजे त्यावर फक्त गवत असले पाहिजे असे नाही. आशिया खंडात आल्यावर तुम्हाला फिरकीला पोषक खेळपट्टय़ाच मिळू शकतात. या मालिकेसाठी कठोर मेहनत आम्ही घेऊ आणि जिंकण्यासाठीच मैदानात उतरू.