आर्मस्ट्राँगवरील बंदीने उत्तेजकविरोधी कायद्याचे उल्लंघन! Print

तज्ज्ञांचे मत
ए.एफ.पी., लुसान

प्रतिष्ठेच्या टूर डी फ्रान्स सायकल शर्यतीत पटकावलेली सात जेतेपदे काढून घेतानाच महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याच्यावर उत्तेजके घेतल्यामुळे टाकण्यात आलेल्या आजीवन बंदीमुळे उत्तेजकविरोधी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक क्रीडा कायदातज्ज्ञांच्या मते, ‘‘अमेरिका उत्तेजकविरोधी संस्थेने सादर केलेल्या अहवालानंतर आर्मस्ट्राँगच्या उत्तेजकांचे भीषण वास्तव सर्वासमोर आले असले तरी जागतिक सायकलिंग महासंघाने त्याला केलेली शिक्षा ही उत्तेजकविरोधी कायद्याला धरून नाही.’’
‘‘हे प्रकरण काहीसे विशेष असले तरी उत्तेजकविरोधी नियमांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. महासंघाने अमेरिकेच्या या अहवालाला महत्त्व देण्याचे कारण नव्हते. यामुळे महासंघाने आपली विश्वासार्हता गमावली आहे,’’ असे स्वित्र्झलड येथील न्यूचाटेल विद्यापीठात उत्तेजक कायद्याचे प्राध्यापक असलेल्या अ‍ॅन्टोनियो रिगोझ्झी यांनी सांगितले. उत्तेजकविरोधी नियमांनुसार, एखाद्यावरील आरोप निश्चित करण्यासाठी आठ वर्षांची मर्यादा असते. पण कित्येक वर्षांनंतर आर्मस्ट्राँगसह त्याच्या माजी सहकाऱ्यांची उत्तेजक चाचणी करण्यात आल्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या होत्या. स्वित्र्झलडमधील क्रीडाविषयक कायदेतज्ज्ञ अ‍ॅलेक्सी श्चोब म्हणाले, ‘‘अमेरिकेच्या संस्थेने आर्मस्ट्राँगवरच लक्ष केंद्रित केले. अनेक माजी सायकलपटूंनीही उत्तेजके घेतली होती. पण त्यांच्याबाबतीत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.’’
आर्मस्ट्राँगच्या प्रतिमेचे दहन
लंडन : महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी घालण्यात आल्यानंतर लंडनमध्ये त्याच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. पिवळ्या रंगाची जर्सी घातलेल्या आर्मस्ट्राँगच्या ३० फूट उंच स्टीलच्या प्रतिमेचे शुक्रवारी दहन केले जाणार आहे.