रेल्वेला रोखण्याचे मुंबईचे मनसुबे Print

सचिन, झहीर, रोहित, रहाणे यांच्या समावेशामुळे मुंबईचे पारडे जड
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

नवा हंगाम, नवी आव्हाने आणि नवे स्वरूप आदी वैशिष्टय़ांसह शुक्रवारपासून देशभरात रणजी क्रिकेट स्पध्रेला प्रारंभ होत आहे. इंग्लंडविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका येत्या दोन आठवडय़ांत सुरू होत असल्यामुळे कप्तान महेंद्रसिंग धोनी वगळता भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज मंडळी यंदा रणजीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग यांच्यासह क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा व्ही. व्ही. एस. लक्ष्मणही पॅड बांधून तयार आहे. यंदा ४०वे रणजी विजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने उतरणाऱ्या मुंबईच्या संघातही मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेगवान गोलंदाज झहीर खान यांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वेविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात तरी मुंबईचे पारडे जड आहे. पण सचिन रणजी खेळणार असल्यामुळे वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटरसिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी मुंबईने रणजी क्रिकेटमध्ये रेल्वेचा डावाने पराभव केला होता. आता संजय बांगरच्या नेतृत्वाखालील रेल्वे संघापुढे आव्हान अधिक कठीण आहे. कारण मुंबईकडे सचिन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अभिषेक नायर अशी फलंदाजीची समर्थ फळी आहे. याचप्रमाणे झहीर, अजित आगरकर, धवल कुलकर्णी, रमेश पोवार आणि इक्बाल अब्दुल्ला असा गोलंदाजीचा मजबूत मारा आहे.२००९च्या रणजी हंगामात सचिन अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर तीन वर्षांनी सचिन रणजी क्रिकेटमध्ये खेळत आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तीन डावांत सचिनच्या खात्यावर फक्त ६३ धावा जमा होत्या. याशिवाय तिन्ही डावांमध्ये त्याचा त्रिफळा उडाला होता. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५१ शतके नावावर असणाऱ्या सचिनला मागील २५ डावांमध्ये शतक झळकावण्यात अपयश आले आहे. या सर्वावर मात करण्यासाठी सचिनने रणजीच्या सरावाचा मार्ग पत्करला आहे.
गतवर्षी मुंबईच्या संघाने तीन निर्णायक विजयांसह साखळीमध्ये २५ गुण मिळवीत बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत तामिळनाडूने मुंबईचा मार्ग रोखला होता.
गेल्या वर्षी सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. आता यंदा मुंबईला फक्त रणजी विजेतेपदच हवे, असा निर्धार कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.यंदा एलिट आणि प्लेट गटांच्या पद्धतीला रजा देऊन रणजी नव्या स्वरूपात अवतरत आहे. २७ संघ प्रत्येकी नऊप्रमाणे तीन गटांमध्ये विभागण्यात आले असून, प्रत्येक संघाला गटातील अन्य आठ संघांशी सामना करावा लागणार आहे. याशिवाय गुणदान पद्धतीमध्येही संघांना अनुकूल असे बदल करण्यात आले आहे.
संघ - मुंबई : अजित आगरकर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, झहीर खान, रमेश पोवार, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अभिषेक नायर, कौस्तुभ पवार, धवल कुलकर्णी, अंकित चव्हाण, इक्बाल अब्दुल्ला, आदित्य तारे, अखिल हेरवाडकर.
रेल्वे : संजय बांगर (कर्णधार), रणजितकुमार माळी, अनुरीत सिंग, आशीष यादव, अविनाश यादव, नितीन भिले, व्ही. चेलूवाराज, मुरली कार्तिक, महेश रावत, अमित पौनीकर, हार्दिक राठोड, पी.एम. मडकईकर, शिवकांत शुक्ला, मरीपुरी सुरेश, कृष्णकांत उपाध्याय.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा. पासून.