चेल्सीने काढला पराभवाचा वचपा Print

मँचेस्टर युनायटेडला  ५-४ असे नमवले
लीग चषक फुटबॉल
ए.एफ.पी.,लंडन

युरोपियन चषक विजेत्या चेल्सीने लीग चषक फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मँचेस्टर युनायटेडला ५-४ असे हरवत मागील पराभवाचा वचपा काढला. या विजयासह चेल्सीने लीग चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. मँचेस्टर युनायटेडने तीन वेळा आघाडी घेतली. पण चेल्सीने प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर देत बरोबरी साधली. अखेर ९४व्या मिनिटाला इडेन हझार्डने पेनल्टी-किकवर केलेल्या गोलमुळे सामना अतिरिक्त वेळेत नेला. डॅनियल स्टरिज आणि रामिरेस यांनी गोल करत चेल्सीला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. चेल्सीला आता पुढील फेरीत लीड्स युनायटेड संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.
‘‘हा सामना अतिशय रंगतदार झाला. हा सामना आम्ही कधीच जिंकायला हवा होता. पण प्रत्येक वेळी पिछाडीनंतर आम्ही सामन्यात मुसंडी मारली,’’ असे चेल्सीचे प्रशिक्षक रॉबेर्टे डी मटेओ यांनी सांगितले.
रविवारी इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये चेल्सीवर २-३ असा विजय मिळवणाऱ्या युनायटेड संघात १० बदल करण्यात आले होते. २२व्या मिनिटाला रायन गिग्ज याने गोल करत युनायटेडचे खाते खोलले. त्यानंतर ११ मिनिटांनी डेव्हिड लुइझ याने चेल्सीला बरोबरी साधून दिली. चेल्सीच्या गॅरी काहिलने ५२व्या मिनिटाला हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. मात्र त्यानंतर नानीने गोल करून युनायटेडला बरोबरी साधून दिली. अन्य सामन्यांत, स्वानसी सिटीने लिव्हरपूलला ३-१ असे हरवून आगेकूच केली.