क्लार्क, स्मिथ, रायडर पुन्हा लिलावात Print

आयपीएल संघांची डच्चू खेळाडूंची यादी जाहीर
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथसह न्यूझीलंडचा फलंदाज जेसी रायडरला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय आयपीएलमधील पुणे वॉरिअर्स संघाने घेतला आहे. या निर्णयामुळे हे खेळाडू अन्य संघांना लिलावात उपलब्ध असतील. आयपीएलमधील विविध संघांनी आपल्या संघाचे स्वरूप स्पष्ट केले. मायकेल क्लार्कचा करार एकच वर्षांचा होता. त्याच्या कराराचे नूतनीकरण होणार नसल्याने पुन्हा लिलावासाठी त्याचा विचार होईल. ग्रॅमी स्मिथ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळत नाही. यामुळे आयपीएल सामन्यांत त्याचे प्रयोजन नसल्याने तर जेसी रायडरने आयपीएलनंतर कोणत्याही व्यावसायिक स्वरूपाचे क्रिकेट खेळले नसल्याने या खेळाडूंना कायम न करण्याचा निर्णय पुणे वॉरिअर्सने घेतला आहे.
दरम्यान रवींद्र जडेजाच्या गच्छंतीचे वृत्तातही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला आपल्या ताफ्यात कायम राखले आहे. डेक्कनकडून हैदराबाद संघाची मालकी मिळवलेल्या सन टीव्हीने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल ख्रिस्टियनला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षांसाठी आयपीएल संघांनी जाहीर केलेल्या संघानुसार, राजस्थान रॉयल्स संघाने केवळ १४ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. या निर्णयामुळे नवीन खेळाडू विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे ८, ४२३, २६१ रुपये एवढी रक्कम असणार आहे.
मुंबई इंडियन्सने सर्वाधिक म्हणजेच २७ खेळाडूंना आपल्याच ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन खेळाडू घेण्यासाठी त्यांच्यांकडे फारच कमी रक्कम शिल्लक आहे. हरभजनला संघात ठेवत त्याच्याबद्दलच्या अफवांना मुंबई इंडियन्सने पूर्णविराम दिला आहे.
कोलकाताने २२ तर किंग्स इलेव्हन पंजाबने १९ खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने १८ खेळाडूंना कायम ठेवताना मात्र रॉबिन बिस्तला त्यांनी डच्चू दिला आहे.