भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना बंगळुरूत
|
|
दोन ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय सामने होणार क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
गृह मंत्रालयाने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला परवानगी दिल्याच्या एक दिवसानंतरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. पाकिस्तान संघ २२ डिसेंबरला बंगळुरूत दाखल होणार असून उभय संघांमधील मालिकेला २५ डिसेंबरपासून सुरुवात होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना नाताळच्या दिवशी बंगळुरूत होईल. दुसरा ट्वेन्टी-२० सामना अहमदाबाद येथे २७ डिसेंबरला होईल. त्यानंतर पाकिस्तान संघ तीन दिवसांनंतर चेन्नईत पहिला एकदिवसीय सामना खेळेल.
कोलकाता आणि दिल्ली येथे उर्वरित दोन एकदिवसीय सामने अनुक्रमे ३ आणि ६ जानेवारी रोजी खेळवण्यात येतील. इंग्लंड संघ दोन वेळा भारतात येणार असून त्यादरम्यान ही मालिका होणार आहे. इंग्लंड संघ दुसरा आणि अंतिम ट्वेन्टी-२० सामना २२ डिसेंबर रोजी मुंबईत खेळणार असून त्याच दिवशी पाकिस्तान संघाचे भारतात आगमन होणार आहे. त्यानंतर इंग्लंड संघ नाताळच्या सुट्टीसाठी मायदेशी परत जाणार आहे. इंग्लंड संघ ११ जानेवारीला पुन्हा भारतात दाखल होईल. त्याच्या पाच दिवसआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेचा समारोप झालेला असेल. या निर्णयाचे स्वागत करताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाका अश्रफ म्हणाले, ‘‘भारत आणि पाकिस्तान या देशांमधील लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दोन्ही देशांमधील नातेसंबंध सुधारण्याची गरज आहे. या मालिकेमुळे भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी मदत होणार आहे.’’ २००७ नंतर पाकिस्तान संघ प्रथमच भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. २००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध विकोपाला गेले होते. भारत-पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक तारीख सामना ठिकाण २५ डिसेंबर पहिली ट्वेन्टी-२० लढत बंगळुरू २७ डिसेंबर दुसरी ट्वेन्टी-२० लढत अहमदाबाद ३० डिसेंबर पहिला एकदिवसीय सामना चेन्नई ३ जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना कोलकाता ६ जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना दिल्ली |