अनिर्णीत सामन्यात युवराजचे ‘राज्य’ Print

अष्टपैलू कामगिरीद्वारे सहाव्या क्रमांकासाठी युवीचा दावा मजबूत
समित पटेलचे शतक, तर मॅट प्रायरचे अर्धशतक
अजिंक्य रहाणेचे दुसऱ्या डावात अर्धशतक
प्रशांत केणी, मुंबई

भारतीय भूमीवरील पहिल्या सराव सामन्याचा पूर्वतयारीचा पेपर तरी इंग्लंडसाठी समाधानकारक ठरला आहे. एकाही फिरकी गोलंदाजाला न आजमावण्याचा भारतीय निवड समितीच्या वादग्रस्त निर्णयाचा फायदा कामचलाऊ फिरकी गोलंदाजांना झाला. या अनिर्णीत तीन दिवसीय सामन्याचा अखेरचा दिवसही रंजक घडामोडींचा ठरला. समित पटेलचे संयमी शतक, मॅट प्रायरचे अर्धशतक, युवराज सिंगने आपल्या फिरकीच्या बळावर मिळवलेले पाच बळी आणि अजिंक्य रहाणेचे अर्धशतक ही तिसऱ्या दिवसाची वैशिष्टय़े ठरली.
समित पटेलने सकाळच्या सत्रात आपले दमदार शतक साकारले. त्याने मॅट प्रायर (५१)सोबत सहाव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. पटेलने १४ चौकारांसह १०४ धावा काढल्या. युवराजनेच त्याचा अडसर दूर केला. इंग्लंडने पहिल्या डावात ४२६ धावा उभारल्या. युवराज सिंगने सर्वाधिक २६.५ षटके गोलंदाजी करून ९४ धावांत पाच बळी घेण्याची किमया साधली.
प्रत्युत्तरादाखल भारत ‘अ’ संघाने दिवसअखेपर्यंत ४ बाद १२४ अशी मजल मारली. मुरली विजय (३२) आणि रहाणेने दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी साकारून भारत ‘अ’ संघाचा डाव सावरला. रहाणेने ५४ धावांची खेळी साकारत पहिल्या डावातील अपयश दूर सारण्याचा प्रयत्न केला.
इंग्लिश ख्ेाळाडूंना पहिल्या सराव सामन्यात भारताच्या मुख्य फिरकी गोलंदाजांच्या समोर न आणण्याचा निवड समितीचा डाव यशस्वी झाल्याचेच प्रत्ययास आले. गुरुवारी भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीने युवराजविषयी मत व्यक्त करून प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ निर्माण केली होती. युवराज दोन दिवस क्षेत्ररक्षण करू शकेल का, याची पाहणी करायला हवी, असे धोनीने म्हटले होते. युवराजने या सराव सामन्यात आपल्या अष्टपैलू खेळाद्वारे एक प्रकारे उत्तरच दिले आहे. फलंदाजीत अर्धशतक आणि गोलंदाजीत पाच बळी या कामगिरीमुळे निवड समितीला सहाव्या क्रमांकासाठी युवराजचा निश्चितच विचार करायला लागणार आहे. याशिवाय मनोज तिवारी आणि अजिंक्य रहाणे यांनीही आपली दावेदारी मजबूत केली आहे. सुरेश रैना मात्र आपला प्रभाव पाडू शकला नाही. केव्हिन पीटरसन हा भारतीय मैदानांवर आणि गोलंदाजांवर लीलया प्रभुत्व गाजवतो. पण युवराजच्या गोलंदाजीचा सामना करणे त्याला नेहमीच जड जाते. या सराव सामन्यातही पीटरसनसहित समित पटेल, इयान बेल, मॅट प्रायर हे महत्त्वाचे फलंदाज युवीच्याच फिरकीच्या जाळ्या अडकले. १५ दिवसांपूर्वीच दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेत युवराजने द्विशतकही साकारले होते. आता मोहालीत शुक्रवारपासून हैदराबादविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात खेळण्यासाठीही युवीने प्रयाण केले आहे. या पाश्र्वभूमीवर धोनीचा विरोध डावलून निवड समितीला युवीला संधी देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांना या सामन्यात आपला प्रभाव पाडता आला नसला तरी अशोक दिंडाने टिच्चून गोलंदाजी केली. इरफान पठाणने गोलंदाजीत नसली तरी फलंदाजीत कामगिरी चोख राखली आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’(पहिला डाव) : ३६९
इंग्लंड (पहिला डाव) : ९ बाद ४२६ (अ‍ॅलिस्टर कुक ११९, समित पटेल १०४, मॅट प्रायर ५१, टिम ब्रेसनन नाबाद ३३; अशोक दिंडा २/८६, युवराज सिंग ५/९४)
भारत ‘अ’(दुसरा डाव) : ४ बाद १२४ (मुरली विजय ३२, अजिंक्य रहाणे ५४; जेम्स अँडरसन २/२०).    
भारतीय संघाचा सराव मुंबईत
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे तीन दिवसीय सराव शिबीर मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबादला होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी मुंबईत होणार आहे. त्यानंतर ९ ते ११ नोव्हेंबर यादरम्यान निवड झालेल्या खेळाडूंसाठी विशेष सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीवगळता बाकी सर्व भारतीय खेळाडू आपल्या स्थानिक संघांकडून रणजी सामने खेळणार आहेत.