आता राज्य सरकार चालवणार एमएचए! Print

क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचे सूतोवाच
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकार मुंबई हॉकी असोसिएशनच्या हॉकी स्टेडियमबाबत कोणता निर्णय घेते, याकडे माजी हॉकीपटू, मुंबई हॉकी असोसिएशनचे (एमएचए) विद्यमान पदाधिकारी आणि हॉकी महाराष्ट्राचे महासचिव कमांडर केहार सिंग यांचे लक्ष लागले असतानाच आता राज्य सरकार एमएचए चालवणार असल्याचे सूतोवाच राज्याचे क्रीडा आणि युवा संचालनालय मंत्री पद्माकर वळवी यांनी दिले.
‘‘एमएचएबाबत माझ्या मनात अनेक कल्पना आहेत. एमएचएवर एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू असतात. त्यामुळे एमएचए चालवण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. त्यामुळे ते कोणत्याही तिसऱ्या पक्षाला देण्यात येणार नाही. राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला झळाळी देण्यासाठी राज्य सरकारने योग्य निधी उपलब्ध केला असून योजनाही आखल्या आहेत,’’ असेही वळवी यांनी सांगितले.
एमएचएबाबत राज्य सरकार अन्य पक्षांशी चर्चाविनिमय करत आहे, असेही वळवी यांनी स्पष्ट केले. ‘‘आम्ही अन्य घटक पक्षांशी चर्चा करत असून त्यांच्या सूचना, अनुभवाचा आम्हाला एमएचए चालवताना फायदा होणार आहे,’’ असेही वळवी म्हणाले.