आईच्या हातच्या जेवणाची कशाशीही तुलना नाही! -सचिन Print

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

‘‘माझ्या आईकडून मी माशाचा रस्सा, कोळंबी मसाला असे काही पदार्थ बनवायला शिकलो आहे. आईच्या हातचे जेवण मला अतिशय आवडते. या जेवणाची तुलना कशाशीही करता येत नाही. कोळंबी, मासे आदी मांसाहारी पदार्थ मला अतिशय आवडतात. तुपासोबतचे वरण-भातही मला आवडते,’’ अशा शब्दांत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपले खाद्यप्रेम प्रकट केले, तेव्हा सर्वानी टाळ्या वाजवून या महान क्रिकेटपटूला यथोचित दाद दिली. क्रिकेट समालोचक बोरिया मजुमदार यांनी लिहिलेल्या ‘कुकिंग ऑन द रन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी सचिनने खाद्याविषयक खेळपट्टीवर दमदार टोलेबाजी केली.


आपण घरी किंवा मित्रांसोबत बाहेर जातो आणि त्यांच्या सर्वासाठी जेव्हा जेवण बनवितो तेव्हा सर्वाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटतात. त्याचा मी आनंद लुटतो, असे सचिनने या वेळी सांगितले. इंग्लंड हा देश मला खाद्यपदार्थासाठी विशेष आवडतो, कारण या देशात इथोपियापासून ते जपानपर्यंत सर्व प्रकारच्या जेवणांची हॉटेल्स आहेत. युवराज सिंग, झहीर खान आणि अजित आगरकर यांच्यासोबत जेव्हा असतो तेव्हा आम्ही विविध ठिकाणचे निरनिराळे पदार्थ खाण्याचा आस्वाद घेतो, असे सचिनने सांगितले.
खाद्यविषयक संस्मरणीय आठवणी मांडताना सचिन म्हणाला की, आम्ही झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना संघासोबत जंगल सफारीसाठी गेलो होतो. तेव्हा जंगलामध्ये खमंग चिकन केले होते आणि खाल्ले होते. संघासोबतच्या त्या स्मृती आजही ताज्या आहेत.
१९९७ मध्ये संपूर्ण संघ अजय जडेजाकडे जेवायला जाणार होता, तेव्हा काही वेळ आधी जाऊन सचिनने वांग्याचे भरीत बनविले होते. ही आठवणही सचिनने सांगितली. आहाराविषयीच्या पथ्याबाबत सचिन म्हणाला की, तेलकट पदार्थ मी टाळतो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये याविषयीच्या पथ्यांचे पालन करावे लागते.