पूर्वपरीक्षेत सचिनला घवघवीत यश! Print
  • अजिंक्य रहाणेनेही साकारले निवड समितीचे लक्ष वेधणारे नाबाद शतक
  • रेल्वेच्या निष्प्रभ गोलंदाजीपुढे मुंबईची ४ बाद ३४४ अशी मजल

alt

प्रशांत केणी, मुंबई
आव्हानात्मक अशा इंग्लिश परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी पूर्वपरीक्षेत सचिन तेंडुलकर घवघवीत मिळवून उत्तीर्ण झाला आहे. हे समाधान सचिनच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होते. कारण गेल्याच महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सचिनला तिन्ही डावांत मिळून फक्त ६३ धावा काढता आल्या होत्या.

याशिवाय या तिन्ही डावांमध्ये किवी गोलंदाजांनी त्याचा त्रिफळा भेदल्यामुळे प्रसारमाध्यमांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी सचिनवर टीकेची झोड उठवली होती. आता इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका दोन आठवडय़ांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सराव व्हावा म्हणून तीन वर्षांनी सचिन रणजी क्रिकेटमध्ये खेळला. वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर सचिनने धडाकेबाज शतक झळकावले आणि अजिंक्य रहाणेच्या साथीने दोनशे धावांची भागीदारीही रचली. त्यामुळेच रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या दिवसअखेर मुंबईने रेल्वेच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत ४ बाद ३४४ अशी दमदार मजल मारली. अजिंक्य रहाणेनेही संयमी शतक झळकावले असून तो १०५ धावांवर खेळत आहे.
रोहित शर्माने (१८) रणजीच्या निमित्ताने मिळालेली संधी गमावल्यानंतर रहाणेने सचिनसोबत चांगलीच जोडी जमावली. ३९ वर्षीय सचिनने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून सुरुवात धिमी केली. ३१व्या चेंडूवर त्याने पहिला चौकार ठोकला. पण नंतर मात्र त्याने रेल्वेच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि फक्त १०३ चेंडूंत आपले शतक साजरे केले. मग मात्र त्याने बहारदार फटकेबाजी केली. सचिनने एकंदर २१ चौकार आणि ३ षटकारांच्या सा'ााने १३६ चेंडूंत १३७ धावा काढल्या. वेगवान गोलंदाज अनुरित सिंगच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लिपमध्ये पराग मडकईकरकडे झेल देऊन सचिन माघारी परतला. या शतकी खेळीमुळे इंग्लंडच्या कसोटी मालिकेपूर्वी सचिनचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यातील पहिल्या डावात फक्त चार धावांवर बाद झाल्यामुळे अजिंक्य रहाणे निराश झाला होता. पण गुरुवारी हे नैराश्य झटकून त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रणजीमध्ये खेळताना आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय देत रहाणेने शतक झळकावून निवड समितीलाही विचार करायला लावला आहे.
‘शतक झळकावल्याचे समाधान नक्कीच आहे. सचिन समोर असल्यामुळे मी त्याला स्ट्राइक देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. तो मैदानावर असतो तेव्हा अनुभवाचे सल्ले हे मिळतच असतात. त्यामुळे शतकी खेळी साकारताना आत्मविश्वास दुणावत गेला,’’ अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर अजिंक्य रहाणेने व्यक्त केली.
धावफलक
मुंबई (पहिला डाव) : कौस्तुभ पवार झे. रावत गो. अनुरित सिंग २४, आदित्य तरे त्रिफळा गो. कार्तिक ४७, अजिंक्य रहाणे खेळत आहे १०५, रोहित शर्मा धावचीत १८, सचिन तेंडुलकर झे. मडकईकर गो. अनुरित सिंग १३७, अभिषेक नायर खेळत आहे ०, अवांतर १३, एकूण ९० षटकांत ४ बाद ३४४
बाद क्रम : १-४५, २-१००, ३-१४३, ४-३४३
गोलंदाजी : कृष्णकांत उपाध्याय १८-१-७८-०, हार्दिक राठोड २१-१-६४-०, अनुरित सिंग १७-४-५३-२, संजय बांगर ८-०-४४-०, दिनेश कार्तिक २०-२-५५-१, आशिष यादव ५-०-३३-०, शिवकांत शुक्ला १-०-१३-०.