साकेत मायनेनीला दुहेरी मुकुटाची संधी Print

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
साकेत मायनेनी याने दुहेरीतील विजेतेपदापाठोपाठ एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी निर्माण केली.
साकेतने एकेरीत इंडोनेशियाच्या ख्रिस्तोफर रुग्केट याचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडविला. त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांबरोबरच व्हॉलीजचा कल्पकतेने उपयोग केला. दोन्ही सेट्समध्ये त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. त्याच्या वेगवान खेळापुढे ख्रिस्तोफरला फारशी संधी मिळाली नाही. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत प्रकाश अमृतराज  याने ऑस्ट्रियाच्या निकोलस रिसेगी याचे आव्हान संपुष्टात आणले. त्याने अनपेक्षित विजयाची मालिका पुढे चालू ठेवताना निकोलस याचा ६-३, ६-४ असा पराभव केला. त्याने परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला.
दुहेरीत साकेत याने पुरव राजा याच्या साथीत विजेतेपद मिळविले. या जोडीने एन.श्रीराम बालाजी व अरुणकुमार राजगोपालन यांचा पराभव केला. अटीतटीने झालेल्या या लढतीत साकेत व पुरव यांनी ७-५, ६-७ (३-७), १०-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.