४० भारतीय अ‍ॅथलिट्स दोषी खेळाडूंच्या यादीत Print

पी.टी.आय.
नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अ‍ॅथलिट्सची प्रगती यथातथाच आहे मात्र उत्तेजक सेवनांच्या बाबतीत भारतीय अ‍ॅथलिट्स अग्रणी असल्याचे आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेने (आयएएएफ) उत्तेजक सेवनप्रकरणी ३१ ऑक्टोबपर्यंत दोषी आढळलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल ४० भारतीय अ‍ॅथलिट्सचा समावेश आहे.   
यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत दोनदा सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली अश्विनी अकुंजीचे नाव आहे. गेल्यावर्षी राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेने हाती घेतलेल्या प्रकरणात मनदीप कौर आणि सिनी जोस हे अ‍ॅथलिट्स दोषी आढळले होते. गेल्या तीन वर्षांमध्ये या ४० अ‍ॅथलिट्सची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती.
अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताने एकदाही ऑलिम्पिक पदक मिळवलेले नाही. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने अंजू बॉबी जॉर्जच्या रुपाने केवळ एका पदकाची कमाई केली आहे. मात्र उत्तेजक सेवन प्रकरणात ४० भारतीय अ‍ॅथलिट्स दोषी आढळणे निश्चितच शरमेची बाब आहे.
काही वर्षांपर्यंत वेटलिफ्टिंगला या खेळाला उत्तेजक सेवनाचा अभिशाप होता. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर २०४ उत्तेजक सेवन प्रकरणांमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूंमध्ये ४० भारतीय खेळाडू आढळल्यामुळे आता अ‍ॅथलेटिक्सपटू उत्तेजक सेवनाची धुरा पुढे चालवत असल्याचे चित्र पुढे आले आहे.