भारत-पाकिस्तान मालिकेचा कालावधी मोठा हवा -अब्बास Print

पी.टी.आय.

कराची
भारत-पाकिस्तान मालिका आयोजित होत आहे याचा निश्चित आनंद आहे, मात्र या दौऱ्याचा कालावधी मोठा असायला हवा होता, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार झहीर अब्बास यांनी व्यक्त केले. बीसीसीआयने या मालिकेसाठी हिरवा कंदील मिळावा यासाठीची प्रक्रिया राबवली. हे प्रयत्न प्रशंसनीय आहे, मात्र या दौऱ्याऐवजी कसोटी सामन्यांसह एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०चा समावेश असलेला मोठा दौरा उचित ठरला असता, असे त्यांनी पुढे सांगितले.
पाच वर्षांच्या कालावधीनंतर या दोन देशांतील क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे या मालिकेचे महत्त्व अनोखे आहे. दौऱ्यात कसोटी सामन्यांचा समावेश व्हायला हवा होता, मात्र दोन्ही संघांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हे होऊ शकले नाही. लवकरच हे दोन्ही संघ कसोटी मालिका खेळतील, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा
शिष्टमंडळ भारतात येणार
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यापूर्वी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचे एक सुरक्षा शिष्टमंडळ भारतात दाखल होणार आहे.
भारतात पाकिस्तान संघासाठी पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमचे शिष्टमंडळ ज्या ठिकाणी सामने होणार आहेत, तेथील व्यवस्थेची पाहणी करतील आणि तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांशी समन्वय साधतील, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अशरफ यांनी सांगितले.