आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र टेनिस लीग Print

अनेक दिग्गज टेनिसपटूंचा सहभाग निश्चित
क्रीडा प्रतिनिधी

पुणे
क्रिकेट व बॅडमिंटनप्रमाणेच पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र टेनिस लीग आयोजित केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होणाऱ्या या स्पर्धेत ऑलिम्पिकपटू विष्णू वर्धन, डेव्हिसपटू साकेत मायनेनी, श्रीराम बालाजी यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
डेक्कन जिमखाना क्लब येथे होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी अमानोरा नॉलेज फाऊंडेशनने उचलली आहे. स्पर्धेबाबत सिटी कापरेरेशनचे संचालक अनिरुद्ध देशपांडे व महाराष्ट्र टेनिस लीगचे मुख्य विश्वस्त नंदन बाळ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ही स्पर्धा २ ते ६ जानेवारीदरम्यान होणार आहे.
लीगकरिता सहा संघ असतील व प्रत्येक संघात किमान सहा खेळाडू असतील. त्यामध्ये किमान दोन महिला खेळाडू व एक महाराष्ट्राचा खेळाडू अनिवार्य असेल. स्पर्धा प्रथम अव्वल साखळी पद्धतीने व त्यानंतर बाद पद्धतीने होणार आहे. प्रत्येक सामना पाच लढतींचा असेल. त्यामध्ये पुरुष एकेरीचे दोन, महिला एकेरी, मिश्रदुहेरी व पुरुष दुहेरीचा समावेश राहील.
लीगकरिता देशातील ८० मुख्य खेळाडू लिलावाकरिता उपलब्ध केले. त्यामध्ये राष्ट्रीय विजेता एन.जीवन, जगात पहिल्या दीडशे खेळाडूंमध्ये स्थान मिळविणारा पुरव राजा, ऑलिम्पिकपटू विष्णू वर्धन, तसेच श्रीराम बालाजी, साकेत मायनेनी आदी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असेल. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या मानांकनानुसार ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंकरिता एक लाख रुपये, ‘ब’ श्रेणी खेळाडूंसाठी ६० हजार रुपये, ‘क’ श्रेणी खेळाडूंसाठी ३० हजार रुपये अशी किंमत ठरविण्यात आली आहे. प्रत्येक फ्रँचाइजीकरिता किमान चार लाख रुपये खरेदीची किंमत ठरविण्यात आली आहे.
लीगकरिता सात लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेतील सामने सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणार असून प्रेक्षकांकरिता गॅलरी उभी केली जाणार आहे.