पुजारा, धवनच्या कामगिरीकडे लक्ष Print

इंग्लंडचा दुसरा सराव सामना आजपासून मुंबई ‘अ’ संघाशी
क्रीडा प्रतिनिधी

मुंबई
मुंबई ‘अ’ आणि इंग्लंड यांच्यात शनिवारपासून नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शिखर धवन या विशेष निमंत्रित खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष असणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये ‘रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून दमदार पदार्पण केले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील दावेदारी मजबूत करण्यासाठी पुजारा प्रयत्नशील असणार आहे. या मोसमाच्या सुरुवातीला स्थानिक क्रिकेटमध्ये मोठय़ा खेळी केल्यामुळे राखीव सलामीवीर म्हणून धवन शर्यतीत आहे. या दोघांपाठोपाठ कर्णधार सूर्यकुमार यादव, क्षेमल वायंगणकर आणि बलविंदर सिंग संधू ज्युनियर यांच्या कामगिरीकडेही निवड समितीचे बारकाईने लक्ष असणार आहे. क्षेमलने गेल्या दौऱ्यात इंग्लंडचे सहा बळी मिळवले होते. त्याचबरोबर संधूने गेल्या मोसमात रणजी स्पर्धेत थाटात पदार्पण केले होते. फलंदाज हिकेन शाह आणि भाविन ठक्कर तसेच लेगस्पिनर सागर गोरिवले आणि मध्यमगती गोलंदाज जावेद खान हे पाहुण्या संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत.
भारत ‘अ’ संघाविरुद्धचा सामना अनिर्णीत राखून इंग्लंडने भारत दौऱ्याची सुरुवात समाधानकारक केली होती. मैदानावर जास्तीत जास्त काळ फलंदाजी करणे, ही इंग्लंडची रणनीती आहेत. त्यामुळे पहिल्या सराव सामन्यात कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि समीत पटेल यांनी शतकी खेळी साकारली होती. त्याचबरोबर जोनाथन ट्रॉट आणि मॅट प्रायर यांनी अर्धशतके झळकावली होती. फलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसन आणि टिम ब्रेस्नन यांनी शुक्रवारी कसून सराव केला. स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रॅहम ओनियन्स यांच्यावरही इंग्लंडच्या गोलंदाजीची भिस्त असेल. फिरकीपटू मॉन्टी पानेसरला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
संघ : मुंबई ‘अ’ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, हिकेन शाह, भाविन ठक्कर, सुफियान शेख, निखिल पाटील (ज्यु.), अभिषेक राऊत, नीलकंठ परब, भाविश शेट्टी, क्षेमल वायंगणकर, बलविंदर सिंग संधू (ज्यु.), सागर गोरिवले, जावेद खान, शार्दुल ठाकूर.
इंग्लंड - अ‍ॅलिस्टर कुक, जेम्स अ‍ॅण्डरसन, इयान बेल, टिम ब्रेस्नन, निक कॉम्प्टन, स्टीव्हन फिन, समीत पटेल, केव्हिन पीटरसन, मॅट प्रायर, ग्रॅमी स्वान, जोनाथन ट्रॉट, स्टुअर्ट ब्रॉड, जो रूट, जिमी बेअरस्टो, ग्रॅहम ओनियन्स, इऑन मॉर्गन, मॉन्टी पानेसर.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा. पासून.       

खेळपट्टीवर स्थिरावण्याकडे लक्ष -सूर्यकुमार यादव
संघ अडचणीत असताना जबाबदारीने खेळ करणे आवश्यक आहे, म्हणूनच या हंगामात खेळपट्टीवर स्थिरावणे हेच उद्दिष्ट असल्याचे मुंबईचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने सांगितले. नैसर्गिक शैलीनुसार खेळ करताना मी आक्रमकपणे फलंदाजी करत असे. यादरम्यान खराब फटके खेळताना मी माझी विकेट गमावत असे. हे टाळण्यासाठी या हंगामात खेळपट्टीवर ठाण मांडून संयमी खेळ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संघाच्या विजयात योगदान देणे महत्त्वाचे असल्याने हा बदल केला असल्याचे यादव सांगतो.