मुंबई हॉकी असोसिएशन आता अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर! Print

हॉकीचे तीन तेरा
तुषार वैती

मुंबई
मुंबई हॉकी असोसिएशन(एमएचए)च्या मैदानाचा उपयोग हॉकीऐवजी लग्नसमारंभ, पाटर्य़ा आणि अनेक कौटुंबिक समारंभासाठी अधिक होत असल्याची तक्रार काही माजी हॉकीपटूंनी तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे केली होती. त्यामुळे महानगरपालिकेने मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडला दणका देत भाडेतत्त्व करार रद्द करून महिंद्रा स्टेडियमचा ताबा घेण्यासाठी पावले उचलली आहेत. महिंद्रा स्टेडियम वाचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू असली तरी ‘एमएचए’ ही लिमिटेड कंपनी आता अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर आहे.
याबाबत एमएचएचे अध्यक्ष मंघा सिंग बक्षी आपली बाजू मांडताना म्हणाले की, ‘‘आम्ही राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांची भेट घेतली असून आमच्या कार्याची माहिती त्यांना दिली आहे. आम्ही एमएचएवर लग्नसमारंभ आयोजित करतो, हे सत्य असले तरी आम्ही फक्त पार्किंगच्या ठिकाणची जागा आणि लाऊंज वापरण्यासाठी देतो. हॉकी खेळ चालवण्यासाठी निधी उभारणे महत्त्वाचे आहे, म्हणूनच आम्ही हे मैदान खाजगी सोहळ्यांसाठी देतो.’’
‘‘राज्य सरकारने आम्हाला दणका दिल्यानंतर कठीण परिस्थितीतून जात असल्यामुळे आम्ही विशेष सर्वसाधारण सभाही रद्द केली.
आता आम्हाला श्वास घ्यायला वेळ मिळाला असून आम्ही न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत. राज्य सरकारने एका पक्षाची बाजू ऐकून तडकाफडकी निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारला आमची बाजूही ऐकावी लागणार आहे. आमची बाजू सक्षम आहे, असे मला वाटते,’’ असे एमएचएचे सचिव राम सिंग राठोड यांनी सांगितले.
आता राज्य सरकार मुंबई हॉकी असोसिएशन चालवणार असल्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना वळवी म्हणाले की, ‘‘मुंबई हॉकी असोसिएशनवर विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची आमची योजना आहे.
राज्य सरकार आता हॉकीच्या विकासासाठी प्रयत्नशील असेल.’’ वळवींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राठोड म्हणाले की, ‘‘देशातील कोणते राज्य सरकार क्रीडा संघटना चालवत आहे? हे काम सरकारचे नाही. हॉकीच्या विकासासाठीच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आम्ही राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी तयार आहोत. विरोधात जाण्यापेक्षा एकत्र येऊन काम करण्याची ही वेळ आहे,’’ असे राठोड यांनी सांगितले. आम्हाला स्टेडियममध्ये प्रवेश आणि एमएचएचे सदस्यत्व दिले नाही, या माजी हॉकीपटूंच्या आरोपाचे खंडन करत मंघा सिंग बक्षी म्हणाले की, ‘‘आम्ही कोणत्याही खेळाडूला स्टेडियममध्ये जाण्यासाठी अडवले नाही.
 ११ आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी फोनवरून संपर्क साधून त्यांना एमएचएचे सदस्यत्व देण्याविषयी आम्ही चर्चा केली. त्यापैकी तीन सदस्यांनी एमएचएमध्ये येऊन आपले सदस्यत्व कार्ड घेऊनसुद्धा गेले.’’