बॉक्सिंगसाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक -मेरी Print

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये पदके जिंकण्याची क्षमता भारतीय बॉक्सर्समध्ये असून त्यांच्या विकासाकरिता उद्योगसमूहांचे सहकार्य आवश्यक आहे, असे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या एम. सी. मेरी कोम हिने सांगितले.
राष्ट्रीय अंडी उत्पादक महामंडळ (एनईसीसी)व वेंकीज समूहातर्फे बॉक्सर मेरी कोम हिला दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या वेळी विजेंदरसिंग, देवेंद्रसिंग, शिवा थापा, जय भगवान, मनोजकुमार, विकास कृष्णन व सुमीत संगवान या खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले.  
मेरी कोम म्हणाली, ‘‘लंडन ऑलिम्पिकमध्ये मला मिळालेल्या कांस्यपदकामुळे बॉक्सिंगचा दर्जा उंचावला आहे. या खेळात पूर्वी केवळ भीतीपोटी महिला सहभागी होत नसत, आता मात्र त्या सहभागी होतील. एनईसीसीप्रमाणेच अन्य उद्योजकांनी खेळाडूंना आर्थिक सहकार्य केले तर निश्चितपणे ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारतास बॉक्सिंगमध्ये किमान तीनचार पदके मिळतील.