हॉकी लीगचा कलगीतुरा! Print

हॉकीचे तीनतेरा भाग-३
तुषार वैती

मुंबई
एकीकडे मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडकडून महिंद्रा स्टेडियम जवळपास हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. पण त्यांनी मात्र वर्ल्ड सीरिज हॉकी स्पर्धेच्या संयोजकांना स्पर्धेसाठी महिंद्रा स्टेडियम देण्याचे ठरवले असून त्याच कालावधीत रंगणाऱ्या हॉकी इंडिया लीगसाठीही महिंद्रा स्टेडियम आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी प्रतिस्पर्धी हॉकी इंडियाने केली आहे. त्यामुळे महिंद्रा स्टेडियमवर आता वर्ल्ड सीरिज हॉकी वि. हॉकी इंडिया लीग असा कलगीतुरा रंगणार आहे. याबाबत मुंबई हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष मंघासिंग बक्षी म्हणाले की, ‘‘दोन-तीन महिन्यांपूर्वी आपल्या स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर वर्ल्ड सीरिज हॉकीच्या संयोजकांनी आमच्याशी मैदानाबाबत संपर्क साधला होता. त्यांच्याकडून आम्ही तात्पुरत्या तारखा नोंदवून घेतल्या होत्या. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. एमएचए ही भारतीय हॉकी संघटनेशी संलग्न संस्था असल्यामुळे आम्हाला वर्ल्ड सीरिज हॉकीसाठी महिंद्रा स्टेडियम उपलब्ध करून देणे भाग होते. काही आठवडय़ांनंतर हॉकी इंडिया लीगच्या आयोजनासाठी आम्हाला मैदान हवे, असा दूरध्वनी हॉकी इंडियाकडून आम्हाला आला. दोन्ही स्पर्धाच्या तारखा जवळपास सारख्याच असल्यामुळे आम्ही सावध पवित्रा घेतला. आम्हाला हॉकीचा विकास करायचा आहे, राजकारण नाही, असे सांगून आम्ही दोन्ही स्पर्धाच्या संयोजकांनाच एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याचे सांगितले आहे.’’
मात्र हॉकी इंडियाशी संलग्न असलेल्या हॉकी महाराष्ट्राचे सचिव कमांडर केहार सिंग यांनी वेगळे मत नोंदवले. ‘‘आम्हाला स्पर्धेच्या १५ दिवस आधी आणि नंतर महिंद्रा स्टेडियम हवे आहे, अशी मागणी आम्ही एमएचएकडे केली होती. पण आमची मागणी त्यांनी फेटाळून लावली. तशा आशयाचे एमएचएने पाठवलेले पत्रही आमच्याकडे आहे. म्हणूनच आम्ही मैदानाचा ताबा असलेल्या राज्य सरकारकडे धाव घेतली.’’
‘‘राज्य सरकारने आमचे म्हणणे ऐकून घेतले. भारतीय हॉकी महासंघाला (आयएचएफ) भारतीय ऑलिम्पिक समितीची (आयओए) मान्यता आहे का, हेही त्यांनी आम्हाला विचारले. ज्या संघटनेला आयओएची मान्यता असेल त्याच संघटनेला स्टेडियम दिले जाईल, असे आश्वासन आम्हाला राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी दिले. स्टेडियमवरील अ‍ॅस्ट्रो-टर्फ आणि अन्य साधनसामग्रीचे नुकसान होऊ नये, यासाठी सुरक्षा हमी भरण्यात यावी, अशी अटही राज्य सरकारने घातली. काही दिवसांपूर्वीच आम्ही पाच लाख रुपये रक्कम जमा केली आहे. त्यानंतर स्पर्धेआधी आम्हाला २० लाख रुपये रक्कम जमा करावयाची आहे,’’ असेही केहार सिंग यांनी सांगितले.
वर्ल्ड सीरिज हॉकी ही पैसे कमावण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते, असा आरोपही केहार सिंग यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘‘देशात हॉकी चालवण्याचे सर्वाधिकार आयओएने हॉकी इंडियाला दिले आहेत. त्यामुळे हॉकीपटूंचे हित आम्ही जाणून आहेत. निम्बस आणि भारतीय हॉकी संघटनेच्या विद्यमाने होणारी ही स्पर्धा निव्वळ पैसे कमावण्याच्या हेतूने आयोजित केली जात आहे.’’ वर्ल्ड सीरिज हॉकी स्पर्धा १५ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान तर हॉकी इंडिया लीग ५ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान रंगणार आहे.     
    (क्रमश:)