मुंबईची रणजी सलामी फक्त तीन गुणांच्या समाधानाची! Print

कौस्तुभ पवार आणि अजिंक्य रहाणेची दमदार अर्धशतके
प्रशांत केणी, मुंबई

रणजी हंगामाची निर्णायक विजयासह झोकात सुरुवात करण्याची संधी ३९वेळा रणजी विजेत्या मुंबई संघाने गमावली. कृष्णकांत उपाध्याय आणि अनुरित सिंग या रेल्वेच्या जोडीने सकाळच्या तासाभराच्या खेळात फॉलोऑनची नामुष्की वाचवली आणि चौथ्या दिवसाची रंगतच संपवून टाकली.त्यामुळे पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेणाऱ्या मुंबईने चौथ्या आणि अखेरच्या दिवशी सामना अनिर्णीत राखत फलंदाजीचा सराव करणेच पसंत केले. कौस्तुभ पवार (८५) आणि अजिंक्य रहाणे (८४) यांनी आपली दमदार अर्धशतके साजरी केली. रणजी क्रिकेट स्पध्रेतील अ गटामधील आपल्या पहिल्या सामन्यातून मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर फक्त तीन गुण मिळविण्यात समाधान मानले, तर रेल्वेने एक गुण मिळविला.
गतवर्षीप्रमाणे डावाने विजय मिळवून रणजी हंगामाचा सुखद प्रारंभ करण्याचे मुंबईचे मनसुबे वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीने हाणून पाडले. खेळपट्टीकडून पुरेशी साथ मिळत नसल्यामुळे गोलंदाजांना बळी मिळविण्यासाठी झगडावे लागत असल्याचे रविवारी सायंकाळीच मुंबईचा कर्णधार अजित आगरकरने स्पष्ट केले होते. सोमवारी सकाळी कृष्णकांत उपाध्याय आणि अनुरित सिंग या आदल्या दिवशीच्या नाबाद जोडीने खेळपट्टीवर नांगर टाकत जिद्दीने किल्ला लढविला. या जोडीने नवव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचून रेल्वेला फॉलोऑन वाचवून दिला. त्यानंतर ४२६ धावांवर रेल्वेचा पहिला डाव आटोपला. वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने रेल्वेचे दोन्ही बळी मिळवले. झहीर खान आणि अजित आगरकर या दोघांनी गोलंदाजी केली नाही.
मग मुंबईने कौस्तुभ पवार (९ चौकार आणि एक षटकारासह ८५ धावा) आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकांच्या बळावर चौथ्या दिवसअखेपर्यंत ५ बाद २३० अशी मजल मारली. पवार-रहाणे जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रहाणेने ८१ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांनिशी ८४ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. रोहित शर्माने (२०) पुन्हा निराशा केली, तर अभिषेक नायरला दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. रेल्वेविरुद्ध आम्हाला निर्णायक विजयाची अपेक्षा होती, पण खेळपट्टीकडून पुरेशी साथ मिळाली नाही. परंतु फलंदाजांना फॉर्म गवसले, ही आमच्यासाठी सकारात्मक बाब म्हणता येईल. हंगामाची सुरुवात चांगली झाली, याबाबत मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी दिली.