कबड्डी क्षेत्रात भाई जगताप यांची वाढती घुसखोरी! Print

वि. वि. करमरकर
चेंबूरमधील आरसीएफचे सरव्यवस्थापक (प्रशासन) पारखी अधिकारवाणीने प्रतिपादन करतात की, आरसीएफचे कॉर्पोरेट ऑफिस प्रियदर्शिनी व क्रीडासंकुल मुंबई उपनगरातच आहे. पण आपल्या हद्दीबाहेरील आरसीएफमध्ये गुरुवारपासून होणाऱ्या कबड्डी स्पर्धा भरवणारे, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे सर्वेसर्वा भाई जगताप ठामपणे वारंवार पत्रकारांना बजावतात की, आरसीएफ उपनगरात नसून मुंबई शहरातच आहे!
आश्चर्याची गोष्ट अशी की, आरसीएफ हे मुंबई शहरात नसून मुंबई उपनगरात आहे, (म्हणजेच मुंबई उपनगर जिल्हा संघटनेच्या हद्दीत किंवा कार्यकक्षेत आहे) असे पारखी चटकन व स्पष्टपणे सांगतात. पण आरसीएफचे सीएमडी राजन, अर्थ विभागाचे गौतम सेन, बिट्टो, मोहन कांकर, देशपांडे प्रभृती, बडे बडे अधिकारी, आमदार भाई जगताप यांच्या पत्रकार-परिषदेतील विसंगत विधानांबाबत मौन पाळतात किंवा जगताप यांच्या सुरात सूर मिसळवून मोकळे होतात!
हा प्रश्न उद्भवला निमंत्रितांच्या अ. भा. पातळीवरील स्पर्धेवरून. आरसीएफतर्फे मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यकारी संचालक पी. जी. देशपांडे यांना सहीने इंग्रजीतील पत्रकानुसार या स्पर्धेत पुरुषांचे बावीस व महिलांचे अठरा संघ उतरतील, तर मुंबई शहर कबड्डी असो.ने दिलेल्या मराठीतील पत्रकाच्या पहिल्या पानानुसार पुरुषांचे सोळा व महिलांचे सोळा, तर त्याच पत्रकातील चौथ्या-पाचव्या पानानुसार पुरुषांचे वीस व महिलांचे एकोणीस संघ सहभागी होतील! पण हा निव्वळ प्राथमिक गोंधळ. भाईंचा कळीचा मुद्दा पुढेच येतो!
संलग्नता बदलली कशी!
मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या स्थापनेपासून सुमारे वीस-बावीस वर्षे, आरसीएफ ही उपनगरातच संलग्न आहे. आरसीएफमधील सर्वश्री केशवराव माने, बाळ वाडवलीकर, खामकर आदी कर्मचारी उपनगर संघटनेत पदाधिकारीही होते. या गोष्टी भाई जगताप यांना माहीत नसतीलही किंवा त्यांनी त्या सोयीस्करपणे नजरेआड केल्या असतील, पण गेली कित्येक वर्षे या क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबई शहरातील कार्यकर्त्यांना कशा माहीत नसतील? मग मुंबई शहर संघटनेच्या कार्यकक्षेबाहेरील आरसीएफला त्यांनी गेल्या चार वर्षांत संलग्नता कशी दिली आणि आता उपनगरातील मैदानात स्पर्धा भरवण्याची घुसखोरी का केली?
आपल्या हद्दीबाहेरील क्रीडांगणात स्पर्धा घेताना आरसीएफचे कॉर्पोरेट ऑफिस मुंबई शहर जिल्ह्य़ाच्या कार्यकक्षेत आहे, असा खोटा दावा भाई जगतापांसारखा मुरब्बी राजकारणी का करीत आहे? उघडत आहे, की पाच लाख रुपयांच्या इनामासह सव्वीस लाख रुपयांच्या आरसीएफ पुरस्कारात त्यांना मतलब आहे. महाराष्ट्र शासनाची छत्रपती शिवाजी महाराज करंडक स्पर्धा सातारा-सांगली-मराठवाडा-कोकण-विदर्भ आदी अविकसित भागात होण्याचे जवळपास ठरले होते. पण ऐन वेळी राष्ट्रीय कबड्डीच्या संयोजनास छत्रपती शिवाजी करंडकाचे काम दिले गेले. ग्रामीण महाराष्ट्रातील जिल्हा संघटनांच्या हातातोंडाशी आलेला घास, सधन मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी परस्पर पळवला. त्याचे खरे कारण कोणते? भाईंना तेव्हा मतलब होता शासनाच्या पन्नास लाख रुपयांच्या अनुदानाचा! जसा आता आरसीएफच्या सव्वीस लाखांचा. किमान सव्वीस लाखांचा!
नोंद ४१ वर्षांपूर्वीची
आरसीएफ ऊर्फ राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स ही वास्तू चेंबूर-कुर्ला विभागातील. मुंबई उपनगराचे जादा जिल्हाधिकारी (अ‍ॅडिशनल कलेक्टर) यांच्याकडे याबाबत काय नोंद आहे?
भाई जगताप यांच्या माहितीसाठी ही एकेचाळीस वर्षांपूर्वीची नोंद नव्याने सांगण्याची वेळ आली आहे.
कोणताही पुरावा न देता, वीस-बावीस मिनिटांच्या भाषणात व त्यानंतर दहा-बारा मिनिटांच्या प्रश्नोत्तरात ‘मॅटर इज क्लोज्ड’ अशा भाषेवर येणाऱ्या भाई जगतापांसाठी ही प्राथमिक माहिती सांगतो.
आरसीएफच्या ताब्यातील एकशे तीन एकरांची ही जमीन, मुंबई उपनगरात (होय, मुंबई उपनगरातच!) येते. आरसीएफ भौगोलिकदृष्टय़ा येतं कुर्ला तालुक्यात (होय कुर्ला तालुक्यात, शीव ऊर्फ सायनमध्ये नव्हे) तसेच १९७१ च्या चेंबूर खेडय़ात (होय, चेंबूर खेडय़ात, शीव वा सायनमध्ये नव्हे).
आणि म्हणूनच आश्चर्य वाटतं : आरसीएफचे सीएमडी राजन यांच्यापासून ते छोटे-मोठे अधिकारी यांची दिशाभूल, भाई जगताप कसे करू शकले?
तीन दशकांपूर्वी मुंबई व उपनगर असे विभाजन झाले. काळाच्या ओघात उपनगराचे विभाजन मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गानुसार होऊ शकेल. ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजनही अटळ आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कोणती खबरदारी घेणार आहे?
आरसीएफ ही बॅडमिंटन-टेबल टेनिस क्षेत्रात उपनगरात आहे. कबड्डी वीस-बावीस वर्षे उपनगरातच होती. आता तिची संलग्नता बदलू कशी शकते? एअर इंडिया व महिन्द्र यांचे दाखले याबाबत निर्थक आहेत. कारण त्यांच्या कॉर्पोरेट कचेऱ्या मुंबई शहरात आहेत.
शेवटी प्रश्न उरतो भाई जगताप यांच्या घूसखोरीचा. छत्रपती शिवाजी महाराज करंडक स्पर्धा त्यांनी हायजॅक केली, तेव्हा उपनगर संघटनेतर्फे गजानन कीर्तिकर यांनी आवाज उठवला होता. पण महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ला नेतृत्व देणारे मोहन भावसार, औरंगबादचे किशोर पाटील, गणेश शेट्टी व आता दुर्दैवाने हयात नसलेले फिदा कुरेशी नुसते कुरकुर करीत राहिले. आता आरसीएफसारख्या सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित अधिकारी चूपचाप बसले आहेत. त्यांना सांगावेसे वाटते, काळ सोकावतो, हेच खरे दु:ख याची जाणीव ठेवा!
भाई जगताप यांनी कबड्डी स्पर्धाचे संयोजन स्वत:च्या ताकदीवर भरपूर करावे. त्याचे स्वागतच होईल. वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरात एल्फिन्स्टन रोडजवळील कामगार कल्याण मंडळात किंवा ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यात उत्तमोत्तम स्पर्धा जरूर घ्याव्यात. पण महसूल खात्याच्या कुर्ला तालुक्यातील आरसीएफ हायजॅक करू नये. ते काम त्यांनी उपनगर संघटनेवरच सोपवावं. त्यातच त्यांची शान व कबड्डीची जान राहील!