प्रेमचंद पर्वाची कहाणी! Print

शरीरसौष्ठवाच्या चालत्याबोलत्या विद्यापीठाने जागवल्या आठवणी

पराग फाटक
लुधियाना
प्रेमचंद डोगरा हे नाव उच्चारताच शरीरसौष्ठवाचे वैभवशाली पर्व डोळ्यासमोर उभे राहते. मि. युनिव्हर्स, मि. आशिया आणि सलग नऊ मिस्टर इंडिया किताबांसह पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित प्रेमचंद म्हणजे शरीरसौष्ठवाचे चालतेबोलते विद्यापीठच! त्यांच्या पोतडीतील असंख्य चषक, ढाली, सन्मानचिन्हे या साऱ्यांचे संग्रहालय प्रेमचंद यांच्या होशियारपूरमधील घरात तयार करण्यात आले आहे. इतिहासाच्या सोनेरी आठवणी प्रेमचंद यांनी खास ‘लोकसत्ता’साठी जागवल्या. हे संग्रहालय शक्तिप्रदर्शनासाठी नाही. चषक, ढाली, सन्मानचिन्हे यातून सकारात्मक ऊर्जा लोकांनी घ्यावी आणि देशाप्रती आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम योगदान द्यावे, हाच प्रामाणिक हेतू मनात ठेवून पत्नीच्या साह्याने हे संग्रहालय उभारल्याचे प्रेमचंद यांनी सुरुवातीलाच स्पष्ट करतात.
पाकिस्तानातून निर्वासित म्हणून भारतात आलेल्या कुटुंबात प्रेमचंदचा जन्म झाला. दहाव्या वर्षीच पितृशोकाचे दु:ख ओढवले, मात्र आईचे संस्कार आणि सकस दुधाचा खुराक याच्या बळावरच निरोगी शरीर जोपासल्याचे प्रेमचंद सांगतात. शालेय स्तरावर कुस्तीमध्ये नाव कमवत असतानाच ब्रह्मदत्त नावाच्या शिक्षकांच्या सल्ल्यानुसार प्रेमचंद शरीरसौष्ठवाकडे वळले आणि पुढे इतिहास घडला.
आíथक स्थिती बेताची असताना केवळ जिद्दीच्या बळावर पाकिस्तानमध्ये जाऊन पहिल्यांदा आशियाई जेतेपदावर नाव कोरले, हा क्षण अतीव समाधान देणारा असल्याचे प्रेमचंद सांगतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी केल्याने आमच्याकडून खेळण्याची ऑफर अमेरिकेने ठेवली होती, मात्र खेळेन तर भारतासाठीच, या भूमिकेने हा पर्याय ठामपणे नाकारल्याचे प्रेमचंद सांगतात. भारत गरीब देश आहे, भारतीय खेळाडू विश्वविजेता होऊ शकत नाही ही अमेरिकन लोकांची टीका मनाला चटका लावून गेली आणि या टीकेला प्रत्युत्तर देत १९८८ साली ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्डमध्ये विश्वविजेतपदावर नाव कोरले, भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावला हे सांगताना प्रेमचंद यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक जाणवते.
नैसर्गिक ताकद हीच खरी शक्ती, जग जिंकायचेय या भावनेने खेळलो, एकदाही उत्तेजकाची मदत घेतली नाही आणि म्हणूनच हे यश साकारले, असे प्रेमचंद अभिमानाने सांगतात. भारतात अनेक प्रतिभाशाली शरीरसौष्ठवपटू आहेत हे सांगतानाच कारकीर्द संपल्यानंतर खेळाडूंनी खेळासाठी योगदान द्यायला हवे, असे प्रेमचंद आग्रहाने सांगतात. कारकीर्दीत महाराष्ट्राने खूप काही दिले, ते माझे दुसरे घरच असल्याचे प्रेमचंद सांगतात.