‘सातत्याच्या अभावामुळेच रैनाने स्थान गमावले’ Print

पी.टी.आय.

लखनौ
सातत्याचा अभाव हाच सुरेश रैना याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे, असे रैनाचे प्रशिक्षक दीपक शर्मा यांनी येथे सांगितले. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रैनास कसोटी संघात स्थान मिळाले नाही.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी पहिल्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघात उत्तर प्रदेशचा कर्णधार रैना याला संधी मिळालेली नाही. याबाबत शर्मा यांनी सांगितले, रैना हा खरंतर अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही. हेच त्याला भारतीय संघातून वगळण्यामागचे कारण असावे. त्याच्या खेळाच्या तंत्रात कोणताही दोष नाही. रैना याने आतापर्यंत सतरा कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना २८.४४ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. रैनाने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पणातच शानदार शतक टोलविले होते. त्यामुळे या डावखुऱ्या खेळाडूकडून चाहत्यांनी मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या. मात्र त्याची कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही.
शर्मा म्हणाले, आधुनिक जगात बदलत्या स्वरूपानुसार स्वत:ला खेळाशी अनुरूप करून घेण्याची आवश्यकता असते, तसेच संघात स्थान मिळविण्यासाठी एवढी जबरदस्त स्पर्धा आहे की आपले नाणे खणखणीत करण्यासाठी खेळाडूला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणे अनिवार्य आहे. मला खात्री आहे, रैना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवील.