मँचेस्टर सिटीला पराभवाचा धक्का Print

मलागा बादफेरीसाठी पात्र
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
पी.टी.आय., पॅरिस
चॅम्पियन्स लीग स्पर्धेत यश मिळावे यासाठी हजारो रुपये खर्चनूही मँचेस्टर सिटीला यशाचा मार्ग सापडत नाहीये. अजॅक्सविरुद्धचा सामना २-२ बरोबरीत सुटल्याने मँचेस्टर सिटीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे स्पेनच्या मलागाने एसी मिलानविरुद्धचा सामना १-१ ने बरोबरीत सोडवून बाद फेरीत धडक मारली.
स्लेम दे जाँगने दहाव्या मिनिटालाच गोल करत अजॅक्सला चांगली सलामी करून दिली. त्यानंतर लगेचच दे जाँगने आणखी एक गोल करत अजॅक्सची आघाडी बळकट केली. सिटीतर्फे २२व्या मिनिटाला याया टौरेने गोल केला आणि सिटीचे खाते उघडले. यानंतर सिटीच्या खेळाडूंनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. अजॅक्स विजय मिळवणार अशी परिस्थिती असताना ७४व्या मिनिटाला सर्जिओ ऑग्युरोने गोल झळकावत बरोबरी करून दिली. या बरोबरीमुळे गुणतालिकेत सिटीचा संघ पिछाडीवर पडला आहे.  
दुसऱ्या लढतीत एसी मिलान आणि मलागा यांच्यात गोलसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. ४०व्या मिनिटाला मलागातर्फे इलिस्यूने पहिला गोल केला.  ७३व्या मिनिटाला अलेक्झांड्र पाटोने एसी मिलानसाठी गोल करत बरोबरी करून दिली.  यानंतरही दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले मात्र अखेर हा सामना बरोबरीतच सुटला. बरोबरीसह अजॅक्सने पुढच्या फेरीत आगेकूच केली आहे.